शिकागो : विनाशकारी वादळाने अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागात पुन्हा कहर केला आहे. देशातील विविध भागात भीषण वादळ आणि चक्रीवादळामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
त्याचबरोबर १२ लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाकडून बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच, पीडितांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
शुक्रवारी पहाटे युनायटेड स्टेट्सच्या दक्षिण आणि मध्य-पश्चिम भागांमध्ये विनाशकारी वादळाने कहर केला. इलिनॉयमध्ये या उद्रेकात आणखी चार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वादळातील मृतांची संख्या २१ झाली आहे. अहवालानुसार, वेगवेगळ्या ठिकाणी ६० हून अधिक चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.
अधिका-यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी आर्कान्सामधील लिटल रॉक आणि इतर ठिकाणी विनाशकारी चक्रीवादळ धडकले. यामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झाली आणि त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला, तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आपत्कालीन व्यवस्थापनाच्या आर्कान्सा विभागाच्या प्रवक्त्या लट्रेशा वुड्रफ यांनी सांगितले की, क्रॉस काऊंटीमधील लिटल रॉकच्या ईशान्येला चार लोक ठार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मिसिसिपी शहरात विनाशकारी चक्रीवादळ आणि जोरदार वादळाने कहर केला होता, त्यामुळे अनेक घरांची पडझड झाली होती. यात २३ जणांचा मृत्यू झाला होता.