निलंगा(लक्षमण पाटील) : तालुक्यातील केदारपूर येथील एका विवाह समारंभात जेवणातून २३५ व-हाडींना विषबाधा झाली असून त्यांच्यावर निलंगा उपजिल्हा रुग्णालय व अंबुलगा (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील मुलीचा विवाह देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील मुलाशी दि. २२ रोजी १२.३० वाजता केदारपूर येथे संपन्न झाला. लग्न सोहळ््यास उपस्थित असणा-या १ हजार व-हाडींना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
यातील २३५ जणांना मळमळ उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला. लग्न लागल्यानंतर केदारपूर काटेजवळगा, जवळगा अंबुलगा बु., सिंदखेडसह अनेक गावांतून लग्न कार्यासाठी आलेल्या व-हाडी लोकांनी भात, वरण, बुंदी, चपाती आणि वाग्यांच्या भाजीचे जेवण उरकले. जेवणानंतर सर्व व-हाडी आपल्या गावी निघून गेले. मात्र, सायंकाळी ६ ते ७ पासून व-हाडींना पोट दुखणे, उलट्या जुलाब सुरू झाला. त्यांना देवणी तालुक्यातील वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्र, निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र काटेवळगा, जवळगा उपकेंद्र व काही जण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जवळपास साधारणत: २३५ व-हाडींवर उपचार सुरू आहेत.
यातील ७३ रुग्णांनी अंबुलगा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतला. यात ५९ रुग्णांना उपचार करून घरी पाठवण्यात आले, तर १४ रुग्णांना दि. २३ मे रोजी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर रोडे यांनी सांगितले. यामुळे केदारपूर येथील परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. काही रुग्ण उपजिल्हा रुग्णालय निलंगा, वलांडी व काही खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन घराकडे परतले.
तत्पूर्वी अंबुलगा बु. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर रोडे, डॉ. नरेंद्र माकणे व कर्मचारी जगदीश सगर यांनी काटेजवळगा केदारपूर येथील व-हाडींना रुग्णवाहिका पाठवून विषबाधा झालेल्या लोकांना वेळेत आणून उपचार केले. रात्रभर त्यांच्यावर उपचार केल्याने त्यांची तब्येत बरी झाली असल्याचे रुग्णांनी सांगितले.
अन्नाचे नमुने पुण्याला पाठविले
केदारपूर येथे वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले असून येथील पाण्याचे व अन्नाचे नमुने तपासणीकरिता पुणे येथे पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोडे यांनी सांगितले. दरम्यान, परिस्थितीची पाहणी करण्याकरिता अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बरुरे, साथ रोग अधिकारी डॉ. कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप कुमार जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी भेट देऊन पाहणी केली.
वरणातून झाली विषबाधा
ज्या लोकांनी वरण खाल्ले, त्यांनाच विषबाधा झाली. वरण न खाणा-या व-हाडींना काही झाले नाही, असे उपचार घेत असलेल्या व-हाडीने सांगितले. पोटात दुखत असल्याने व उलट्या होत असल्याने लहान मुलांना याचा खूप त्रास सहन करावा लागला, असे सांगण्यात आले.
अंबुलगा बु. केंद्रातील ७३ रुग्ण घरी परतले
अंबुलगा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर रोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ७३ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील ५९ रुग्णांना डिस्चार्ज दिला, तर १४ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चांगली झाल्याने या आरोग्य केंद्रातील सर्व ७३ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले.