लखनऊ : उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात प्रवासी मजुरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. मजुरांनी भरलेल्या ट्रॅकला एका मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत २३ मजुरांचा जागेवर मृत्यू झाला तर एका मजुराचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत १५ ते २० मजूर गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमींना सैफई येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Read More उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात, सहा मजुरांचा मृत्यू
दुर्घटना आज पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास घडली
मजुरांनी भरलेला ट्रक रस्त्यावर उभा होता. मात्र, अचानक एका मालवाहू ट्रकने मजुरांच्या ट्रकला धडक दिली. ही दुर्घटना आज पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत बळी ठरलेले बहुतांश मजूर हे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे आहेत. हे सर्व मजूर राजस्थानवरुन बिहार-झारखंडला जात होते.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
औरैया, एसपी सुनिती सिंह आणि अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलीस मदत व बचावकार्यात व्यस्त आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना कानपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. घटनेचा विचार करता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मजूर आपला जीव धोक्यात घालून करत आहेत प्रवास
दरम्यान, काल उत्तर प्रदेशातील जालोन जिल्ह्यातही मजूर असलेल्या डीसीएम गाडीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून 14 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. प्रवासी मजूर मुंबईहून परत येत होते. डीसीएममध्ये एकूण 46 प्रवासी मजूर होते. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की, असुरक्षित पद्धतीने कोणत्याही प्रवासी मजुरांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ नये आणि आज हा अपघात घडला. आजपासून गाजियाबाद आणि नोएडामधून मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी ट्रेनही चालवण्यात येणार आहेत. परंतु, तरी देखील मजूर आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारकडून मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत.
जनपद औरैया में सड़क दुर्घटना में प्रवासी कामगारों/श्रमिकों की मृत्यु दुर्भाग्यपूर्ण एवं दुःखद है, मेरी संवेदनाएं मृतकों के शोक संतप्त परिजनों के साथ हैं।
पीड़ितों को हर संभव राहत प्रदान करने,घायलों का समुचित उपचार कराने व दुर्घटना की त्वरित जांच करवाने के निर्देश भी दिए गए हैं।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 16, 2020