नवी दिल्ली : स्पेनमधील महिला कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्पेन सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दर महिन्याला या मासिक पाळी दरम्यान महिला कर्मचा-यांना ३ दिवसांची मासिक पाळीची सुटी देण्यात येणार आहे. मासिक पाळी दरम्यान महिला कर्मचा-यांना दर महिन्याला ३ दिवस सुटी देणारा स्पेन हा पहिला पश्चिमी देश ठरणार आहे.
स्पॅनिश स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र सोसायटीने असा दावा केला आहे की, मासिक पाळी येणा-या सुमारे एक तृतीयांश महिलांना तीव्र वेदना होतात. या दुखण्याला डिसमेनोरिया म्हणतात. डिसमेनोरियाच्या लक्षणांमध्ये तीव्र पोटदुखी, डोकेदुखी, अतिसार आणि ताप यांचा समावेश होतो. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत हा आराखडा मंजूर करण्यात येणार आहे. या आराखड्यामध्ये महिलांचे मासिक पाळीचे आरोग्य सुधारण्यासाठी इतर उपायांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच स्पेनमध्ये ज्या मुलींना गरज आहे त्यांना सॅनिटरी पॅड पुरवणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे स्पेनमधील महिला आणि मुलींना सॅनिटरी पॅड्स सुलभ दरात मिळणार आहेत. कारण स्पेन सरकारने यावरील व्हॅट कर काढून टाकला आहे. स्पेनमधील महिलांची सुपरमार्केटमधील सॅनिटरी पॅड्स विक्री किमतीतूनही व्हॅट काढला जावा अशी दीर्घकाळापासूनची मागणी आहे, या मागणीचा विचारही आराखड्यात केला गेला आहे.