5 जून ते 5 जुलै अशा 30 दिवसांमध्ये तब्बल तीन ग्रहण पाहण्याचा अनुभव खगोलप्रेमींना अनुभवता येणार
मुंबई : खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. एकाच महिन्यात 3 ग्रहण पाहायला मिळणार आहेत. 5 जून ते 5 जुलै अशा 30 दिवसांमध्ये तब्बल तीन ग्रहण पाहण्याचा अनुभव खगोलप्रेमींना अनुभवता येणार आहे. यावेळी लागोपाठ तीन ग्रहणे होत असल्याने ती अशुभ असल्याने काहीतरी वाईट घटना घडतील असे भाकीत काही ज्योतिषानी वर्तविले आहे त्यात काहीही तथ्य नसल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. यापूर्वी सन २०१८ मध्येही लागोपाठ तीन ग्रहणे झाली होती . त्यावेळी काहीही वाईट घटना घडल्या नव्हत्या तसेच यानंतर सन 2029 मध्येही लागोपाठ तीन ग्रहणे होणार आहे.
5 जून चंद्रग्रहण : ५ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट सावलीभोवती असलेल्या विरळ सावलीतून जेव्हा जाते त्यावेळी ‘ छायाकल्प चंद्रग्रहण’ असं म्हणतात. त्याला ‘मांद्य चंद्रग्रहण- Penumbral Eclipse’ असंही म्हटलं जातं. हे चंद्रग्रहण शुक्रवारी रात्री 11 वाजून 13 मिनिटांपासून उत्तररात्री 2 वाजून 37 मिनिटांपर्यंत दिसणार आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण भारताप्रमाणेच प्रशांत महासागर, ऑस्ट्रेलिया,यूरोप, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व दक्षिण प्रदेश येथून दिसेल.
21 जून कंकणाकृती सूर्यग्रहण : रविवारी 21 जून रोजी ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही भागातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीमध्ये दिसणार आहे. मुंबईतून हे सूर्यग्रहण सकाळी 10 वाजून 1 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 28 मिनिटांपर्यंत दिसणार आहे. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी कधीही पाहू नये. त्यामुळे दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण नेहमी ग्रहणचष्म्यातूनच पहावे.
5 जुलै चंद्रग्रहण : रविवार ५ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी होणारे छायाकल्प ( मांद्य ) चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे चंद्रग्रहण उत्तर पूर्व भाग सोडून आफ्रिका, यूरोपचा दक्षिण-पश्चिम भाग, अंटार्क्टिका, उत्तर भाग सोडून अमेरिका, न्यूझीलंड येथून दिसेल.
Read More गुरुद्वारा कन्टेनमेन्ट झोन २८ दिवस कायम