अमरावती : अमरावतीतील दूषित पाण्याचा मुद्दा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची दखल घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने अमरावतीच्या जिल्हाधिका-यांशी संपर्क साधला आणि कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावतीत मेळघाटच्या पाचडोंगरी भागात दूषित पाणी प्यायल्यामुळे ३ जणांना जीव गमवावा लागला.
तर ७० ते ८० जणांवर उपचार सुरू आहेत. ज्यांना दूषित पाणी प्यायल्यामुळे जीव गमवावा लागला आहे त्यांच्या परिवाराला मदतीचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
मेळघाटात दूषित पाण्याने तिघांचा मृत्यू तर ७० ते ८० जणांची प्रकृती बिघडली आहे. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरीमध्ये दूषित पाणी पिल्याने कॉलरासदृश्य आजाराची साथ आली आहे.
याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तिथे पोहोचल्या. यावेळी खासदार नवनीत राणांसह जिल्हा परिषदचे सीईओ, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलिस अधिका-यांसह जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी हजर होते.