38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeमुंबईतील ३००० रुग्णवाहिका अचानक गायब-किरिट सोमय्या

मुंबईतील ३००० रुग्णवाहिका अचानक गायब-किरिट सोमय्या

एकमत ऑनलाईन

…मग खासगी रुग्णवाहिका मालकांवर कारवाई का करण्यात आली नाही?

मुंबई : रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णालयाच्या दारात तिष्ठत राहणाऱ्या रुग्णवाहिका गेल्या दोन महिन्यांपासून अचानकपणे गायब झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना ५-५ तास प्रतीक्षा करावी तर लागतेच, पण रुग्णवाहिकेअभावी नॉन कोविड रुग्णांचे सुद्धा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे भयावह वास्तव आहे. अशा रुग्णवाहिकांवर मेडिकल कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कोरोना माहामारीच्या या भयंकर संकटात मुंबईतील रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी ५ ते १५ तास प्रतीक्षा करावी लागत आहे. २० मार्चपर्यंत मुंबई आरटीओकडे नोंदणी असलेल्या २९२० खासगी रुग्णवाहिका सेवा देत होत्या. पण गेल्या दोन महिन्यांपासून त्या अचानक गायब झाल्या आहेत. मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत महाविकास आघाडी सरकार खासगी रुग्णवाहिका मालकांवर कारवाई का करत नाही, असा संतप्त सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

Read More  करोनामुळे ठप्प झालेल्या मुंबईला एका बुस्टर डोसची गरज-जितेंद्र आव्हाड

सोमय्या यांनी ५ एप्रिल २०२० रोजी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून कोरोनाग्रस्तांना रुग्णवाहिका सेवा देत नसल्याचे निदर्शनास आणले होते. मात्र तरीही सरकारने रुग्णवाहिका मालकांच्या टोलवाटोलवीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. अद्यापही पेशंटला रुग्णवाहितेसाठी झगडावे लागत आहे. रुग्णवाहिका न मिळाल्याने दादर येथे दवाखान्याच्या दारातच एकाचा मृतदेह अनेक तास पडून होता. सुमारे ४ तासांच्या रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेनंतर तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णलयात नेण्यात आला होता. आजही कोविड-नॉनकोविड रुग्णांना रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबईत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची संख्या मर्यादित असल्याने त्या सर्वत्र पोहोचू शकत नाहीत. सध्या १०८ क्रमांकाच्या ९३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णांचे आता रुग्णवाहिकेविना हाल होत आहेत. दीड महिन्यानंतरही राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णवाहिकांवर कारवाई केलेली नाही. देशात आणि राज्यात मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत नियमाचा महापालिका आणि राज्य सरकारने बऱ्यापैकी वापर केला आहे. मग खासगी रुग्णवाहिका मालकांवर कारवाई का करण्यात आली नाही? सरकारचा त्यांच्यावर वरदहस्त आहे का, असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या