पुणे, 26 मे : पुण्यातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआरपीएफचे एकूण 32 जवान कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईत बंदोबस्ताला असलेल्या दोन कंपनी म्हणजे 200 जवानांपैकी तब्बल 32 जवानांना लागण झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एसआरपीएफ जवानांपैकी कुणालाही लक्षण आढळून आली नव्हती. मात्र आता 32 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्वांनाच धक्का बसला. आतापर्यंत एकूण 98 जवान कोरोनाबाधित झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे त्यातील अनेकजण बरे होऊन घरीदेखील परतले आहेत.
Read More सदानंद गौडा वादाच्या भोव-यात
दरम्यान, पुणे विभागातील 3 हजार 674 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 हजार 719 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 689 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 356 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 215 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 6 हजार 303 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 195 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 819 आहे. कोरोनाबाधित एकूण 289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 208 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 501 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यातील 404 रुण्यांचा समावेश आहे.