मुंबई : एसटी कर्मचा-यांचा रखडलेला पगार २४ तासांत होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचा-यांच्या पगारासाठी सरकारकडून ३५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. तारीख उलटून गेल्यानंतरही पगार न झाल्याने कर्मचा-यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. एसटी महामंडळाला दरमहा ३६० कोटी रुपये पगारासाठी देण्याचे सरकारने कोर्टात मान्य केले होते. मात्र मागील काही दिवसांत सरकारकडून पगारासाठी देखील अपुरा निधी दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
एसटीच्या रखडलेल्या पगारासाठी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे दुपारी चार वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. बैठकीमध्ये एसटी महामंडळाकडून मागील सहा महिन्यांचा बॅकलॉग भरण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीला परिवहन विभागाचे आयुक्त, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पगारासाठी अर्थ विभागाकडे थकित रकमेची मागणी
एसटी महामंडळाकडून पगारासाठी अर्थ विभागाकडे थकित असलेल्या एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. दर महिन्याला कर्मचा-यांना पगारासाठी ३६० कोटी रुपये मिळायला हवेत. मात्र प्रत्यक्षात तेवढी रक्कम दरमहा मिळत नसल्याने महामंडळाकडून अर्थ विभागाला एक पत्र लिहित थकित रक्कम मागितली होती.
मात्र अर्थ विभागाकडून एसटी महामंडळाला आधी दिलेल्या रकमेचा हिशेब देण्यास सांगितले आहे.
एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला ७ ते १० तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारने कोर्टात दिले होते. मात्र दर महिन्यात पगाराला उशीर होत असल्याने कर्मचा-यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. अशात आता पगाराचे भविष्यच विवरणावर अवलंबून असल्याने कर्मचारी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.