श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा आणि श्रीनगर जिल्ह्यात चकमकीत लष्कर ए तोयबाच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात बडगाम जिल्ह्यात अमरीन भट या महिला टीव्ही कलाकाराची हत्या करणा-या दोन दहशतवाद्यांचाही समावेश आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामधील अगनहांजीपोरा परिसरात गुरुवारी रात्री ही चकमक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या चकमकीबाबत काश्मीर क्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी ट्विटरवरून माहिती दिली. लष्कर ए तोयबात नव्याने दाखल झालेले शाहीद मुश्ताक भट (रा. हफ्रू चदूरा, जि. बडगाम) आणि फरहान हबीब (रा. हाक्रिपोरा, जि. पुलवामा) या दोन स्थानिक दहशतवाद्यांचाही या कारवाईत खातमा करण्यात आला. लष्कर ए तोयबाचा कमांडर लतीफ याच्या सूचनेनुसार त्यांनी महिला टीव्ही कलाकार अमरीन भट यांची हत्या केली होती. अमरीन भट यांच्या निर्घृण हत्याकांडाची अवघ्या २४ तासांत उकल करण्यात आली. घटनास्थळावरून एके ५६ रायफल, चार काडतुसे आणि पिस्तुलही जप्त करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
एक दहशतवादी बेमनियात अटकेत
बेमनियातून पोलिसांनी लष्कर ए तोयबाच्या एका हायब्रीड (स्थानिक) दहशतवाद्याला अटक केली. पोलिस, शीघ्र कृती दल, सीआरपीएफ, राष्ट्रीय रायफल्सने संयुक्त मोहीम राबवीत कारवाई केली. नासिर अहमद दार असे त्याचे नाव आहे. तो सोपोरमधील गुंडब्राथचा रहिवासी आहे.