पुणे : पुणे – मुंबई महामार्गावर समीर लॉन्ससमोर सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका ट्रकने चार कामागारांना चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. साजीद खान (वय २५, मु. रा. राजस्थान) असे मृत कामागाराचे नाव आहे. तर संदीप कुमार, प्रल्हाद यादव, भोला कुमार, अनिल कुमार अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पुणे – मुंबई महामार्गावर रविवारी रात्रीपासून पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू होते. त्यामुळे रस्त्यावर कामगारांनी बॅरिकेट लावले होते. सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणा-या एका भरधाव वेगातील ट्रकने रस्त्याचे काम करणा-या कामगारांना चिरडले.
या घटनेमुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आणि एका कामगाराचा मृत्यू झाला, तर इतर तीन ते चार कामगार जखमी झाले असून त्यापैकी दोघे गंभीर आहेत. सर्व जखमींना उपचाराकरिता पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला असून, त्याचा पोलिस शोध घेत आहेत. सदर अपघातामुळे सदर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.