मुंबई : कोविड-१९ च्या महामारीच्या काळात महाराष्ट्रातील तब्बल ४२५३ कैद्यांना पॅरोलवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु कैद्यांना जेव्हा परत बोलावण्यात आले, तेव्हा सुमारे ४०० कैदी परतले नाहीत. आतापर्यंत १८ कैद्यांना मुंबई पोलिसांनी पकडून पुन्हा कारागृहात डांबले आहे.
मुंबई पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, कोविडमधील गुन्हेगारांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. जेव्हा कोविड संपला, तेव्हा त्यांना परत तुरुंगात रिपोर्ट करायचा होता, परंतु ते आले नाही. चौधरी म्हणाले की, आम्ही संपूर्ण यादी घेतली असून त्यानुसार सर्व पोलिस ठाण्यांना काम देण्यात आले आहे. आतापर्यंत आम्ही १८ जणांना अटक करून त्यांना पुन्हा कारागृहात पाठवले आहे. काही लोकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातील २० तुरुंगांमध्ये ३५ हजारहून अधिक कैदी आहेत, जे तुरुंगांच्या निश्चित क्षमतेपेक्षा जास्त आहेत. वाढत्या संसर्गाचा धोका बघून २०२० मध्ये महाराष्ट्रातील कारागृहातून ४२५३ कैद्यांना गर्दी कमी करण्यासाठी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र कोविड संपल्यानंतर पुन्हा कारागृहात जाण्याची वेळ आली, तेव्हा सुमारे ४०० जण भूमिगत झाले आहेत. मुंबई कारागृहातून ७२ कैद्यांची सुटका झाली होती. त्यातील काही तुरुंगात परतले तर काही जण अज्ञातवासात गेले. त्यामुळे आता त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्यासाठी पोलिसांना विशेष मोहीम राबवावी लागत आहे.