चंदीगड : गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर आणि पंजाबमध्ये न्यायालयाने फटकारल्यानंतर आम आदमी पक्षाच्या सरकारने ४२४ व्हीआयपींची सुरक्षा बहाल केली आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने या व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही सहभाग होता. पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने यादी लीक झाल्याबद्दल पंजाब सरकारला फटकारले होते.
व्हीआयपींची सुरक्षा मर्यादित कालावधीसाठीच काढण्यात आली आहे असे पंजाब सरकारने सांगितले होते. त्याचवेळी सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्यांच्या वडिलांनीही मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून सुरक्षा हटविण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणाची वर्तमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असेही ते म्हणाले होते. सिद्धूच्या वडिलांनी भगवंत मान सरकार यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती.
न्यायालयाच्या आदेशानंतर अंमलबजावणी
कोणाची सुरक्षा हटवायची असेल तर त्याचा योग्य तो आढावा घ्यावा, तरच तसा निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने पंजाब सरकारला सांगितले होते. पंजाब सरकारने ४२४ व्हीआयपींची सुरक्षा हटवली होती. यामध्ये शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते चरण जीत सिंग ढिल्लो, सतगुरू उदय सिंग, संत तरमिंदर सिंग यांचाही समावेश होता.