22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशाच्या ४९ व्या सरन्यायाधीशपदी न्या. लळीत यांनी घेतली शपथ

देशाच्या ४९ व्या सरन्यायाधीशपदी न्या. लळीत यांनी घेतली शपथ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. उदय लळीत यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मंत्रीदेखील उपस्थित होते. लळीत कुटुंबातील तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्यही या खास सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. ते ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. या दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह इतर महत्त्वाच्या प्रकरणांवर निकाल येणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

न्या. उदय लळीत हे वकिली करत असताना क्राईम लॉमध्ये विशेष प्रावीण्यासाठी ओळखले जायचे. गुन्हेगारीशी संबंधित अनेक खटल्यांत त्यांनी आपल्या अशिलांची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. कायद्याची जाण, मृदू स्वभाव, बिनतोड युक्तिवादासाठी ते ओळखले जातात. न्या. लळीत यांनी १९८३ मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार कॉन्सिलमध्ये वकील म्हणून कारकीर्दीत सुरुवात केली होती. १९८५ पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. त्यानंतर १९८६ मध्ये ते दिल्लीत स्थायिक झाले.

असाही एक विक्रम
कोणत्याही हायकोर्टाचे न्यायाधीश नसतानाही न्या. लळीत हे देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. याआधी १९७१ मध्ये देशाचे १३ वे सरन्यायाधीश एस.एम. सिकरी यांनी ही किमया साधली होती.

मराठमोळे सरन्यायाधीश
सरन्यायाधीशपदाची जबाबदारी स्वीकारणारे उदय लळीत हे चौथे मराठी व्यक्ती ठरले आहेत. याआधी पी. बी. गजेंद्रगडकर, यशवंत चंद्रचूड आणि शरद बोबडे यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च स्थान भूषवले होते. न्या. लळीत यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५७ रोजी सोलापूरमध्ये झाला. त्यांचे कुटुंबिय मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे.

न्यायमूर्ती लळीत यांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे. आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील सर्वजण वकिलीच करायचे. उदय लळीत यांचे वडील अ‍ॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते १९७४ ते ७६ या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या