झारखंडच्या ६० श्रमिकांची विमानाने घरवापसी

322

नवी दिल्ली: देशभरातून लाखो श्रमिकांना आपापल्या राज्यांत जाण्यासाठी भोगाव्या लागणा-या यातनांच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होत असताना झारखंडसारख्या छोट्याशा राज्याने मात्र लडाखमध्ये अडकलेल्या आपल्या राज्यातील ६० श्रमिकांच्या घरवापसीसाठी चक्क विमानाची व्यवस्था केली. एखाद्या राज्य सरकारने अन्य राज्यांत अडकलेल्या श्रमिकांसाठी अशा प्रकारची व्यवस्था केल्याचे हे देशातील पहिले उदाहरण ठरले आहे.

दोन महिन्यांच्या भय आणि अनिश्चिततेच्या काळानंतर लडाखमध्ये बॉर्डर रोड्स आॅर्गनायझेशन प्रकल्पाच्या कामासाठी गेलेले हे श्रमिक शुक्रवारी दुपारी दिल्ली विमानतळावर उतरले. संध्याकाळी दुस-या विमानाने ते त्यांच्या राज्यात रवाना होतील. झारखंडमधील दुमका जिल्ह्यामधील हे श्रमिक कारगिल जिल्ह्यातील बटालिकजवळ गॅरगॉडोह गावात अडकले होते.

Read More  नेपाळचे पंतप्रधान स्वत:च्याच देशात तोंडघशी

त्यांची वैद्यकीय तपासणी करून बॉर्डर रोड्स आॅर्गनायझेशनने त्यांना गुरुवारी लेहला पोहोचवले. तिथे त्यांनी रात्री ट्रँझिट कॅम्पमध्ये मुक्काम केला. शुक्रवारी त्यांनी दिल्लीसाठी उड्डाण केले. आमचे कामगार राज्यात सुरक्षित परत येणे ही आमची जबाबदारी होती. लडाख प्रशासनातील अधिकारी, बॉर्डर रोड्स आॅर्गनायझेशन, स्पाइसजेट आणि इंडिगोच्या टीमचे मी मनापासून आभार मानतो, असे ट्विट झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केले आहे.

सोरेन यांनी अंदमान आणि निकोबार, लडाख आणि ईशान्य भारतामध्ये अडकलेल्या त्यांच्या राज्यातील श्रमिकांना चार्टर्ड प्लेन पाठवून परत आणण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे परवानगी मागितली होती. या ठिकाणांहून परत येण्यासाठी सध्या दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. मात्र, केंद्राकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर लेहवरून व्यावसायिक कंपन्यांच्या विमानातून श्रमिकांना परत आणण्याची व्यवस्था केल्याचे ते म्हणाले.