22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारत-बांगला देशादरम्यान ७ करार

भारत-बांगला देशादरम्यान ७ करार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मंगळवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परस्पर द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांनी सात करारांवर स्वाक्ष-या केल्या आहेत. हे करार खालीलप्रमाणे आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, विकास कामात बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा भागीदार आहे. दोन्ही देशांतील लोकांमधील सहकार्याची पातळी सातत्याने सुधारत आहे. आम्ही माहिती तंत्रज्ञान, अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही बांगलादेशच्या स्वातंर्त्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एका रॅलीचे आयोजन केले होते. ते म्हणाले की, मला खात्री आहे की अमृत काळाच्या पुढील २५ वर्षांमध्ये आपली मैत्री नवीन उंचीला स्पर्श करेल.

आमची प्राथमिकता लोकांचे प्रश्न सोडविणे
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, आमची प्राथमिकता लोकांचे प्रश्न, गरिबी हटवणे आणि अर्थव्यवस्था विकसित करणे आहे. त्या म्हणाले की, मला वाटते की आम्ही दोघे एकत्र काम करू. जेणेकरून संपूर्ण दक्षिण आशियातील लोक त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतील. दरम्यान, दोन्ही पंतप्रधानांच्या या भेटीत वाढता दहशतवाद आणि कट्टरतावादाच्या मुद्यावरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आम्ही दहशतवाद आणि अतिरेक्यांच्या विरोधात सहकार्यावर भर दिला आहे.

काय आहेत करार?
१. भारत-बांगला देश सीमेवरील कुशियारा नदीचे पाणी कमी करण्याबाबतचा करार.
२. बांगला देश रेल्वेच्या अधिका-यांना भारतीय रेल्वे प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.
३. भारत बांगलादेश रेल्वेला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मदत करेल. या अंतर्गत भारत बांगलादेशला मालवाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि इतर आयटी-आधारित क्षमता वाढविण्यात मदत करेल.
४. बांगला देशी कायदेशीर अधिका-यांच्या प्रशिक्षणासाठी बांगला देशचे सर्वोच्च न्यायालय आणि भारताच्या राष्ट्रीय न्यायिक अकादमी यांच्यात करार करण्यात आला.
५. भारत आणि बांगला देशच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेमध्ये करार.
६. भारत आणि बांगला देश दरम्यान अंतराळ क्षेत्रातील सहकार्यावर करार.
७. भारताची प्रसार भारती आणि बांगला देश टीव्ही यांच्यात टीव्ही प्रसारणाच्या क्षेत्रात करार.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या