पुणे : गेल्या दोन-अडीच महिन्यांत राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असला तरी आणि अल निनोचा प्रभाव राहिला तरी आगामी काळात मान्सून देशामध्ये ९६ टक्के होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्याचा शेतीच्या पिकांवर विपरीत परिणाम झाला आणि नुकसान देखील झाले.
गारपिटीमुळे फळांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी त्याचा आगामी मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता नाही तर देशभरात साधारणपणे ९६ टक्के पावसाचा अंदाज आहे. जरी अल निनोचा प्रभाव असला तरी पाऊस कमी होण्याची शक्यता दिसत नाही. कारण यापूर्वी अनेकदा अल निनोचा प्रभाव असूनही देशभरात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे असे सांगण्यात आले.