पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकीचे फोन येत आहेत. मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना पहिल्यांदा धमकी देण्यात आली. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस नेत्यांना धमकीचे फोन आले.
गुरुवारी पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयातील मोबाईलवर ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा मेसेज आला आहे.
पैसे नाही दिले तर जिवाला धोका असल्याचे मेसेजमध्ये लिहिण्यात आले. त्यानंतर लांडगे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली. या सगळ्या नेत्यांना येणा-या धमकीच्या फोनचा तपास पुणे क्राईम ब्रँचने हाती घेतला आणि तपास सुरू केला. यामध्ये एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याचे नाव इम्रान शेख आहे.
धक्कादायक माहिती अशी की, आरोपी इम्रानला एका मुलीसोबत लग्न करायचे होते मात्र मुलीने लग्नाला नकार दिला. त्याचा राग मानात धरून या मुलाने या मुलीची बदनामी करण्याच्या हेतूने हा प्लॅन आखला. त्यानंतर या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमकी द्यायचा आणि त्या मुलीच्या गाडीचा नंबर सांगून त्या गाडीमध्ये रक्कम ठेवण्यासाठी सांगत होता.