पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणा-या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करीत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या तरुणाच्या मोबाईलमध्ये आणखी काही आक्षेपार्ह मजकूर आढळून आला आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. यामध्ये निखिल भामरे नावाचा एक तरुण बागलाणकर या युजरनेमचा वापर करून केलेले आक्षेपार्ह ट्विट होते. या ट्विटमध्ये लिहिले होते, वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग. या ट्विटवरून जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली होती. यावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कोण आहे निखिल भामरे?
निखिल भामरे हा मूळचा सटाण्याचा आहे. तो सध्या ंिदडोरी तालुक्यातील वरवंडी इथे बी फार्मसीचे शिक्षण घेत आहे. भामरे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने शरद पवारांविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण दिंडोरी पोलिसांनी कारवाई केली आहे. तो बागलाणकर या नावाने आक्षेपार्ह ट्विट करत होता.