जालना: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व आगळ्यावेगळ्या पद्धतीने समजावून सांगणा-या एका शाळकरी मुलाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरात या लहानग्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे कार्तिक वजीर उर्फ भु-या हा शाळकरी मुलगा अल्पावधीत लोकप्रिय झाला होता.
त्यावेळी कार्तिकच्या डोळ्यात व्यंग असल्याची बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातमीची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली होती. यानंतर तातडीने हालचाली झाल्या आणि भु-याला वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांनी मंगळवारी कार्तिक वजीर उर्फ भू-याच्या डोळ्यांची तपासणी केली.
केवळ परिस्थितीमुळे कार्तिकवर त्याचे कुटुंबीय उपचार करू शकत नाही. याची दखल दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,त्यांचे डरऊ मंगेश चिवटे यांनी घेत या होतकरू मुलाच्या वैद्यकीय उपचाराची जबाबदारी घेतली. तसेच जालना जिल्ह्यातील कार्यक्रमाला आले असताना मुख्यमंत्री यांनी भु-याची प्रत्यक्ष भेट घेत त्याच्यावरील उपचाराच्या सूचनाही दिल्या होत्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भु-याच्या बातमीची दखल घेत जालना जिल्ह्यातील समृध्दी साखर कारखान्याचे अध्यक्ष सतीश घाटगे यांना तातडीने पाठवून त्याच्या शिक्षणाची,उपचारांची जबाबदारी उचलली होती.