नाशिक : नाही नाही म्हणता अखेर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून तब्बल १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे नाशिक दौ-यावर आलेले संजय राऊत मुंबईला माघारी फिरताच इकडे ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील ठाकरे गटाचे काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काल रात्री ठाकरे गटातील नगरसेवकांनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीवेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, खासदार हेमंत गोडसे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे संजय राऊत नाशिकमधून माघारी फिरताच सेनेला याठिकाणी मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात आहे.
नाशिक ठाकरे गटाशी सख्य राखून असलेले संजय राऊत यांनी पदाधिका-यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन डॅमेज कंट्रोल रोखले. मात्र काही दिवसांपासून ठाकरे गटात अस्वस्थता होती. काही माजी नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र संजय राऊतांनी नाशिक दौरा केल्यानंतर ही चर्चा काही काळ थांबलेली होती.
त्यानंतर काल परवाच संजय राऊत हे पुन्हा दौ-यावर असताना पुन्हा एकदा पदाधिका-यांशी बैठका घेत विशेष म्हणजे शिंदे गटात प्रवेश केलेले अजय बोरस्ते यांची भेट घेत वैयक्तिक चर्चा केली होती. मात्र संजय राऊत माघारी फिरताच प्रवेशाच्या हालचाली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नाशकातील राजकीय घडामोडींना वेग आला असून नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटातील मोठा गट फोडण्यात शिंदे गटाला अखेर यश आल्याचे म्हटलं जात आहे.