नव्या गाईडलाईन्स जारी, उद्यापासून अंमलबजावणी
नवी दिल्ली : चीनसह इतर देशांत कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अॅलर्ट झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेशातून भारतात येणा-या प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत लेखी निर्देश जाहीर केले आहेत.
हे नियम चीनसह ज्या देशांत सध्या कोरोनाची प्रकरणें वाढत आहेत. त्या देशातून भारतात येणा-या प्रवाशांना ही नवी नियमावली लागू असेल. त्यानुसार एअर सुविधा फॉर्म पुन्हा भरणे अनिवार्य असणार आहे. या फॉर्ममध्ये ७२ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीची माहिती देणे आवश्यक आहे. दरम्यान, २४ डिसेंबरपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय फ्लाईटमधून येणा-या काही प्रवाशांची रँडमली कोविड चाचणी केली जाणार आहे. केंद्राच्या माहितीनुसार संबंधित फ्लाईटमधून कोणालाही चाचणीसाठी निवडले जाईल. प्रत्येक फ्लाईटमधील किमान २ टक्के लोकांना या चाचणीला समोरे जावे लागणार आहे. सॅम्पल दिल्यानंतर या प्रवाशांना विमानतळावरून सोडण्यात येईल. जर एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याच्या रक्ताचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येतील.
चीन, अमेरिका, जपानसह इतर काही देशांत अचानक पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. यामध्ये राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाच्या स्थिचीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.