नवी दिल्ली : वर्षातील पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी होणार आहे. भारतासह जगातील अनेक भागांतील स्कायवॉचर्सना शुक्रवार, ५ मे रोजी होणार्या पेनम्ब्रल चंद्रग्रहणाची झलक पाहण्याची संधी मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार, वर्षातील पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी रात्री ८.४४ वाजता सुरू होईल. जे मध्यरात्री म्हणजे पहाटे १.०१ पर्यंत चालेल. ग्रहणाचा सर्वोच्च काळ रात्री १०.५२ वाजता असेल.
पण ते संपूर्ण चंद्रग्रहण नसून पेनम्ब्रल चंद्रग्रहण असेल. वास्तविक चंद्रग्रहणाचे तीन प्रकार असतात. संपूर्ण चंद्रग्रहण, आंशिक चंद्रग्रहण आणि पेनम्ब्रल चंद्रग्रहण. (खग्रास, खंडग्रास आणि उपछाया)
पेनम्ब्रल चंद्रग्रहण म्हणजे काय?
ग्रहणापूर्वी चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो. याला इंग्रजीत पेनम्ब्रा म्हणतात. हे संपूर्ण चंद्रग्रहण नाही त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर न पडता, चंद्राच्या उपछायेची सावली पृथ्वीवर पडते. म्हणजेच, एक अस्पष्ट सावली पृथ्वीवरून पाहता येते. तसेच पेनम्ब्रल चंद्रग्रहणात चंद्राच्या आकारात कोणताही बदल दिसत नाहीत. हे अगदी सामान्य दिवसांसारखे दिसते, परंतु आपण काळजीपूर्वक पाहिले तर त्याचा रंग हलका मातीच्या रंगाचा किंवा खादीच्या रंगाचा दिसतो.
यापूर्वी २० एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण झाले होते. हे ग्रहण भारतात दिसू शकले नाही. आता वर्षातील पहिले चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे.