शेतक-यांचा आजपासून नाशिक ते मुंबई लॉंगमार्च
नाशिक : माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रविवारपासून नाशिक ते मुंबई अशा शेतक-यांच्या पायी लाँग मार्चला सुरुवात होणार असून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पायी लॉंग मार्च विधानभवनावर धडकणार आहे.
दरम्यान, या पायी लॉंग मार्चच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. यात हक्काच्या वन जमिनीच्या लढाईसाठी नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्यातील गोरगरीब, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सरकारी कर्मचारी, जुनी पेन्शन योजना, कोलमडलेली आरोग्य सेवा, अंगणवाडी मानधन वाढ, पेन्शन योजना, आशा, पोलिस पाटील मानधन वाढ, नुकसानभरपाई या प्रश्नांसाठी विधानसभेवर लॉंग मार्च धडकणार आहे.
आज शेतक-यांच्या पिकाला बाजारात मातीमोल भाव दिला जातो. शेतक-यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. त्यात विजेचा लपंडाव अशा परिस्थितीत शेतकरी जी जी नगदी व अन्नधान्याची पिके तयार करून बाजारात नेतो, तेव्हा त्याच्या शेतीमालाला कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहेत. तसेच शासकीय, निमशासकीय मानधनावरील व कंत्राटी कर्मचा-यांकडे शासनाचे लक्ष वेधून शेतकरी व कर्मचा-यांच्या ज्वलंत मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्याकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नाशिक-मुंबई पायी लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी आमदार जे. पी. गावीत यांच्या व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभेवर रविवार १२ मार्च २०१३ पासून नाशिक से मुंबई असा शेतक-यांचा विराट पायी लाँग मार्च आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कर्मचा-यांनी या विराट शेतकरी वर्गाने पायी लाँग मार्चमध्ये प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आले आहे.