23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडाअफगाणिस्तानविरुद्ध दणदणीत विजय

अफगाणिस्तानविरुद्ध दणदणीत विजय

एकमत ऑनलाईन

विराटचे शानदार शतक, भारताने केला शेवट गोड
दुबई : कर्णधार बदलला आणि संघाचे नशिबही. आजच्या सामन्यात लोकेश राहुलकडे कर्णधारपद देण्यात आले होते. राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने अफगाणिस्तानवर १०१ धावांनी दणदणीत विजय साकारला. यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला सलग २ पराभव पत्करावा लागले होते. पण या सामन्यात मात्र भारताने धमाकेदार विजय मिळवला. भारताचा हा या आशिया चषकातील अखेरचा सामना होता. त्यामुळे भारताने दमदार विजयासह या स्पर्धेचा निरोप घेतल्याचे पाहायला मिळाले.

भारताने अफगाणिस्तानपुढे विजयासाठी २१३ धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाला पहिल्याच षटकापासून धक्के बसायला सुरुवात झाली. भारताच्या गोलंदाजांनीही या सामन्यात कमाल केल्याचे पाहायला मिळाले. भुवनेश्वर कुमारने अफगाणिस्तानच्या पहिल्या ४ फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडेच मोडले. आतापर्यंत ट्रोल होणा-या अर्शदीप सिंगनेही यावेळी भेदक मारा केला आणि अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीला फक्त एका धावेवर बाद केले. त्यानंतर भुवनेश्वरने या सामन्यात अस्मातुल्लाह ओमरझाईला बाद केले आणि आपला पाचवा बळी मिळवला. त्यानंतर दीपक हुडानेही अफगाणिस्तानला अजून धक्का दिला.

तत्पूर्वी, भारताने विराट कोहलीच्या तुफानी शतकाच्या जोरावर २१२ धावांचा डोंगर रचला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. पण या सामन्यात त्याला पुन्हा एकदा लय सापडल्याचे पाहायला मिळाले. विराटने यावेळी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. कोहलीने यावेळी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक पूर्ण केले. कोहलीने ५३ चेंडूंत ११ चौकार आणि चार षटकारांसह १०० धावा पूर्ण केल्या. कोहलीचे हे ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. कोहलीने यावेळी ६१ चेंडूूंत १२ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर नाबाद १२२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये अफगाणिस्तान भारताच्या फलंदाजीपुढे निष्प्रभ झाल्याचे पाहायला मिळाले.

पहिल्या पॉवर प्लेपर्यंतच या दोघांनी दमदार फटकेबाजी केली असे नाही, तर त्यानंतरही या दोघांनी गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळेच भारताला यावेळी शतक सलामी मिळाली. लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी यावेळी भारताला ११९ धावांची सलामी दिली. ही सलामी म्हणजे भारताच्या विजयाचा पाया असल्याचे म्हटले जात होते. पण राहुल बाद झाला आणि ही जोडी फुटली. राहुलने यावेळी ४१ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली. पण तो बाद झाल्यावरही कोहलीने धडाकेबाज फटकेबाजी करत आपले शतक झळकावले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या