पुणे : पुणे जिल्ह्यातील कल्याण-नगर महामार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो आणि पिकअप यांची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाजवळ हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नगरच्या दिशेने येणा-या गाडीला टेम्पोची जोरात धडक बसली. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने थेट पिकअपने गाडीला धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातात पिकअपमधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
पहाटेच्या वेळी हा अपघात झाला असल्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अपघातात नक्की चूक कोणाची याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.