23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयनगरसेवक ते राष्ट्रपती संघर्षमय प्रवास

नगरसेवक ते राष्ट्रपती संघर्षमय प्रवास

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाच्या प्रथम नागरिक म्हणून अखेर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केलाय. एक सर्वसामान्य आदिवासी महिला ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतचा मुर्मू यांचा प्रवास नक्कीच साधा सोपा आणि सरळ नव्हता. मुर्मू यांनी १९७९ मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून आपले बीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ओडिशा सरकारसाठी कारकून म्हणून काम केलं. पुढे पाठबंधारे आणि ऊर्जा खात्यात त्यांची कनिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली. पुढे काही काळ त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले आहे. मुर्मू यांनी अरविंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर या संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरी केली.

१९९७ मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात
द्रौपदी मुर्मू यांनी ख-या अर्थाने १९९७ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला एक वार्ड काऊन्सलर म्हणून सुरुवात केली. त्यानंतर रायरंगपूर नगर परिषदेत त्या नगरसेविका झाल्या, त्यांनी काही काळ नगर परिषदेचं उपाध्यक्षपदही भूषवले. पुढे भाजपच्या तिकीटावर रायरंगपूर विधानसभा मतदाससंघातून त्या २००० आणि २००९ साली आमदार म्हणून निवडून आल्या. आमदारकीच्या पहिल्याच टप्प्यात (२००० ते २००४ ) त्यांनी नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कामही सांभाळले.

दुस-यांदा आमदार; मात्र स्वत:ची गाडीही नाही
पुढे २००९ मध्ये मुर्मू दुस-यांदा आमदार झाल्या. त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:ची गाडीही नव्हती. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती ही केवळ ९ लाख रुपये होते. त्यांच्या पतीकडे एक बजाज चेतक स्कूटर आणि एक स्कॉर्पिओ गाडी होती. महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी त्या चार वर्षे मंत्री राहिल्या होत्या. तसेच त्यांच्यावर ४ लाखाचे कर्ज देखील होते.

मुर्मू झारखंडमधील लोकप्रिय राज्यपाल
सन २०१५ मध्ये मुर्मू भाजपच्या मयूरभंज जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा राज्यपाल बनवण्यात आले. १८ मे २०१५ रोजी मुर्मू यांनी झारखंडच्या पहिल्या महिला, तसेच पहिल्या आदिवासी राज्यपाल म्हणून कार्यभार हाती घेतला. जवळपास सहा वर्षापेक्षा अधिक काळ त्या राज्यपाल पदावर होत्या. मुर्मू या झारखंडमधील लोकप्रिय राज्यपाल होत्या. म्हणूनच कदाचित त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही पदावरुन हटवण्यात आले नव्हते.

वैयक्तिक आयुष्य मात्र शोकांतिकेने भरलेले
विशेष म्हणजे द्रौपदी मुर्मू यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र शोकांतिकेनं भरलेले आहे. मुर्मू यांच्या पतीचे निधन झालेले आहे. एवढच नाही तर त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला. सध्या त्यांच्या कुटूंबात त्यांची एकुलती एक मुलगी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या