सत्यजित तांबे कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत
अहमदनगर : संगमनेरमध्ये येताच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार सत्यजित तांबे यांना मोलाचा सल्ला दिला. मधल्या काळात टीका करणारे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाही थोरात यांनी समाचार घेतला. ‘सत्यजित, तुला काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसलाही तुझ्या शिवाय करमणार नाही. त्यामुळे तू किती दिवस अपक्ष राहणार, हे आपण ठरवू,’ असे सांगत तांबे काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे संकेतही थोरात यांनी दिले.
भारत जोडो यात्रेच्या नियोजनाबद्दल बोलताना थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचेही कौतुक केले. थोरात आज सायंकाळी संगमनेरला आले. संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना थोरात यांनी सुरुवातीला नागपूरमध्ये आपण कसे घसरून पडलो. त्यानंतर पुढे कसे उपचार झाले. या विषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींबद्दल ते म्हणाले, मधल्या काळात पक्षात जे घडले, त्यासंबंधी मी कधीही मीडियासमोर आलो नाही. पक्षातील विषय असे चव्हाट्यावर आणणे मला पसंत नाही. त्या दिवशी मी संगमनेरकरांशी ऑनलाइन संवाद साधला, त्यावेळी वरिष्ठांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला होता. मात्र, तेव्हा मीडिया येथे उपस्थिती असणार याची मला कल्पना नव्हती. माझ्या त्या बोलण्याचे पुढे मीडियाने मोठे भांडवल केले. बरे झाल्यावर मी याआधीच संगमनेरला यायला निघालो होतो. मात्र, पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत भेटायला येणार असल्याने थांबलो. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे, असे थोरात म्हणाले.
सत्यजित फार काळ
अपक्ष राहणार नाहीत
मुळात सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी करण्यामागे तांत्रिक चुकीचे कारण आहे. जर माझे हे दुखणे नसते आणि मी नाशिकमध्ये असतो, तर ही चूकही झाली नसती. सध्या जरी सत्यजित अपक्ष असले तरी ते फार काळ अपक्ष राहणार नाहीत. भारत जोडा यात्रेत त्यांनीही मोठे काम केले आहे. काँग्रेसचा विचार त्यांच्यात रुजला आहे. आम्ही कोणीही काँग्रेसशिवाय दुसरा विचार करू शकत नाही. त्यामुळे सत्यजित यांना काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसलाही सत्यजीतशिवाय करमणार नाही. त्यांचा काय निर्णय करायचा, ते लवकरच करू, असे थोरात म्हणाले.
डॉ. सुधीर तांबेंसारखे
काम करावे लागेल
भाचा सत्यजित यांना सल्ला देताना थोरात यांनी सत्यजित तुमच्या विजयात डॉ. सुधीर तांबे यांचा मोठा वाटा आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. असेच काम तुम्हालाही करायचे आहे, हे लक्षात ठेवा. पुढे अपक्ष राहायचे की काय करायचे हेही आपण लवकरच ठरवू, असे थोरात म्हणाले.
विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल
मधल्या काळात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टीका केली होती. त्यांचाही थोरात यांनी समाचार घेतला. थोरात म्हणाले की, आपल्या शेजारच्या मंत्र्यांना माझी आठवण काढल्याशिवाय करमत नाही. एकही दिवस खाडा न करता ते टीका करतात. मुळात ते राज्याचे मंत्री असले तरी फारसे कोठे जात नाहीत. याच भागात फिरतात. कोठे गेलेच तर तेथे गेल्यावरही किमान अर्धातास माझ्यावरच बोलतात. संगमनेर तालुक्यात त्यांचे काय काय उद्योग सुरू आहेत, तेही आम्हाला माहिती आहेत. त्यांचा हा त्रास आता फार काळ चालणार नाही. त्यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीवही बोलत असतात. सतत गौण खनिज आणि वाळूचा विषय काढतात. मात्र, वाळूवर बंदी घातली तर विकास काम ठप्प होतात. त्यांच्या या धोरणामुळे निळवंडे धरणाचे काम रखडले आहे. वाळू संबंधी ते इतरांवर टीका करीत असले तरी हनुमंत गावात त्यांचे काय चालले आहे, हे आम्हाला माहिती आहे, असेही ते म्हणाले.