24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रआमिर खानचे शेतक-यांना गिफ्ट; ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ या स्पर्धेची घोषणा

आमिर खानचे शेतक-यांना गिफ्ट; ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ या स्पर्धेची घोषणा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शेतक-यांनी गटशेती केल्यामुळे उत्पादनखर्च कमी येईल तसेच शेतक-यांच्या अनेक समस्या कमी होतील असे मत अभिनेता आमिर खान याने व्यक्त केले. आपल्याला परिसंस्था तयार करायची आहे. शेतक-यांना आणखी ज्ञानी करण्यासाठी काम करायचे असल्याचे त्याने सांगितले. यावेळी आमिर खानने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ या स्पर्धेची घोषणा करून शेतक-यांना एक प्रकारचे गिफ्ट दिले आहे. या शेतकरी गटाला तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील देणार असल्याचे त्याने सांगितले. आधी आम्ही पाणी जिरवले आहे, आता आम्हाला शिवार फुलवायचा असल्याचे तो म्हणाला.

आता फक्त पाण्यावर थांबून चालणार नाही

मी गावात जन्मलो असतो तर आज मी वेगळा असलो असतो. फिल्म आणि शेती याचा जवळचा संबंध असल्याचे आमिर खानने सांगितले. शेतीमध्ये विविधता आहे. शेतक-यांच्या आणि आमच्या समस्या सारख्याच असल्याचे आमिरने सांगितले. चार वर्षे आम्ही ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ यावर काम केले. अनेक शेतक-यांना त्याचा फायदा झाला. पाण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आमिर खान याने सांगितले. या चार वर्षांच्या काळात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. मात्र, आता फक्त पाण्यावर काम करून चालणार नाही तर मृदासंवर्धन, पीक पद्धती, पाण्याचा वापर कसा करायला हवा याबाबत काम करावे लागणार आहे. प्रथम आम्ही राज्यातील ३ तालुक्यांत काम सुरू केले, त्यानंतर ३० आणि शेवटी ७० तालुक्यांत काम केल्याचे आमिर खानने सांगितले. गेल्या चार वर्षांच्या काळात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे.
कोरोना काळात पणती तेवत ठेवणा-या जलमित्रांना सलाम
वॉटर कप स्पर्धेची तयारी सुरू झाली होती त्यावेळी कोरोनाचे संकट आले. या काळात कसे काम करणार हे मोठे आव्हान होते. या काळात आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केले. जशी पाहिजे तशी ही दोन वर्षे गेली नसल्याचे आमिर खानने सांगितले. कोरोना काळात संकटे असूनही जलमित्रांनी पणती तेवत ठेवली. एकाही गावात पणती विझली नाही. त्यांनी सातत्याने कामे सुरू ठेवली. त्या सर्व जलमित्रांना सलाम असल्याचे सत्यजित भटकळ यांनी सांगितले. गावात पाणी येते त्यावेळी त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणी मोजणे गरजेचे असते असे भटकळ म्हणाले.

२० शेतकरी कुटुंबांचा सहभाग असणार
‘एक पीक एक गट’ यावर आधारित ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. गट शेतीतील स्पर्धकांना शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी सांगितले. या स्पर्धेत किमान २० शेतकरी कुटुंबांचा सहभाग असणार आहे.

राज्यपातळीवर यासाठी बक्षिसे दिली जाणार आहेत. राज्यपातळीवर प्रथम येणा-या शेतकरी गटाला २५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दुसरे बक्षीस १५ लाख, तर तिसरे बक्षीस १० लाख रुपये दिले जाणार आहे. एकूण ४२ रोख बक्षिसे दिली जाणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या