मुंबई : राज्यपालांच्या या निर्णयाचे मला कायद्याचा अभ्यासक म्हणून वाईट वाटते. राज्यपाल अधिकारांचा गैरवापर करत आहेत. याआधी अनेकदा राज्यपालांच्या पक्षपातीपणाचा मुद्दा चर्चिला गेला आहे. मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच राज्यपालांनी वागायचे असते. राज्यपालांनी बोलावलेले सत्र हे घटनाबा आहे, असे प्रसार माध्यमाशी बोलताना ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले आहे.
मंगळवारी रात्री भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यपालांच्या या पत्रानंतर घटनातज्ज्ञांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटले की, राज्यपालांच्या या निर्णयाचे वाईट वाटत आहे. राज्यपालांकडून आपल्या अधिकारांचा गैरवापर होत असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. बहुमत चाचणीसाठी बोलावण्यात आलेले विधानसभेचे सत्र हे घटनाबा असल्याचा दावा त्यांनी केला.
…तर संविधानाचा अभ्यास नव्याने करावा लागेल
आज जर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या बाजूने निर्णय दिला तर आम्हाला घटना नव्याने शिकवावी लागेल. मी कुठल्या पक्षाचा नाही. पण कायद्याचे उल्लंघन होत असेल तर सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेणे आवश्यक आहे. राज्यपालांचे पदच संशयाच्या भोव-यात येत असेल, तर याचे वाईट वाटते.
सध्याच्या घडीला शिवसेना पक्ष हा ठाकरेंच्याच ताब्यात आहे. राज्यघटना ही सतत उत्क्रांत होणारी गोष्ट आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या बाजूने निर्णय दिला तर आम्हाला घटना नव्याने शिकवावी लागेल, असेही ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले.