पुणे : वेश्याव्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्वीकार करायला हवा. जर्मनीमधे तर त्याकडे आदराने बघितले जाते. मी त्याच्या पाठीमागे आहे, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून पुण्यातील लाल बत्ती भागातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अमृता फडणवीस बोलत होत्या.
समाजात वेश्याव्यवसायामुळे संतुलन राखले जात आहे. वेश्याव्यवसाय हा पुरातन काळापासून आहे. समाजाचे संतुलन राखण्याचे काम करताना तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे. तुम्ही जे काम करत आहात ते प्रामाणिकपणे करत आहात. पैशासाठी आणि गरिबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आल्या असाल तरी देखील गर्वाचं काम करत आहात, अशा शब्दांत त्यांना पाठिंबा दर्शवला.
तुमच्या या व्यवसायाला सर्वोच्च न्यायालयाचा देखील पाठिंबा आहे. तुमचा बचाव करण्यासाठी आम्ही सगळे आहोत. तुम्ही कोणत्याही कारणामुळे या व्यवसायात पडल्या असाल तरी देखील तुम्ही सगळ्या या समाजाचा अविभाज्य भाग आहात. जर तुमच्यावर काही वाईट प्रसंग आला तर तुम्ही आम्हाला कधीही हाक मारा आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असा विश्वास त्यांनी महिलांना दिला.
या मुलींना काय करायचं आहे हे लक्षात घ्या. त्यांना सुरुवात करून देणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यांच्या शिक्षणाची सोय करणे देखील महत्त्वाचं आहे आणि स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणंसुद्धा तेवढंच महत्तवाचं आहे. या व्यवसायामुळे अनेक रोगांची बाधा होऊ शकते मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका. चांगल्या ट्रेनरची नेमणूक करून तुमच्यासाठी योगा सेशन ठेवेन, असेही यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या.