नवी दिल्ली : शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण यावर कोणाचा हक्क आहे यावर आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या घटनेचा मुद्दा उपस्थित केला असून प्रतिनिधीसभा ठाकरेंकडेच असल्याचा दावा केला आहे.
शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभा ठाकरे गटाची आहे, शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच नाही. पक्ष सोडून गेलेले लोक प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाहीत. त्यामुळे घटनेनुसार, प्रतिनिधी सभा ठाकरेंकडेच आहे आणि प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते असे आयोगाला सांगत अॅड. कपिल सिब्बल यांनी मोठा डाव टाकला आहे.
शिंदे गट राजकीय पक्ष नाही : सिब्बल
पक्षाच्या प्रतिनिधी सभेला हजेरी न लावता शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला का गेले? त्यांनी लोकशाहीनुसार आपले म्हणणे मांडायला हवे होते. राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाने कागदपत्रे सादर केली आहेत का? असा सवाल विचारत शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही, असेही यावेळी सिब्बल यांनी म्हटले आहे.