नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने भारतातील १.७५ कोटी पोस्टवर कारवाई केली आहे. फेसबुकने आपल्या मासिक अहवालात याबाबत माहिती दिली आहे. मे महिन्यात फेसबुकने भारतात १३ उल्लंघन श्रेणी अंतर्गत सुमारे १.७५ कोटी पोस्टवर कारवाई केली आहे. छळ, दबाव, हिंसा, ग्राफिक , प्रौढ नग्नता आणि लैंगिक पोस्ट हटवल्या आहेत.
फेसबुकने आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, १ मे ते ३१ मे २०२२ दरम्यान फेसबुकने विविध श्रेणींमध्ये १.७५ कोटी लेखांवर कारवाई केली आहे. तर फेसबुकचा दुसरे प्लॅटफॉर्म व्हॉटसअॅपने याच कालावधीत १२ श्रेणींमध्ये सुमारे ४१ लाख पोस्टवर कारवाई केली आहे.
अहवालात असे म्हटले आहे की, कारवाई करणे म्हणजे फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरून कोणतीही पोस्ट काढून टाकणे. शिवाय इतरांना त्रासदायक वाटू शकतील अशा प्रतिमा व व्हिडीओंना कव्हर अप करणे आणि इशारा देणे.
ट्विटर इंडियाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात लागू झालेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार, पाच दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेल्या मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मने दर महिन्याला अनुपालन अहवाल, प्राप्त झालेल्या तक्रारी आणि कारवाईची माहिती प्रकाशित करणे आवश्यक आहे. यामध्ये काढून टाकलेल्या किंवा आधीच सक्रियपणे अवरोधित केलेल्या सामग्रीबद्दल माहिती देखील आहे. ट्विटर इंडियाच्या जून २०२२ च्या पारदर्शकता अहवालात असे म्हटले आहे की, २६ एप्रिल २०२२ ते २५ मे २०२२ या कालावधीत देशात दीड हजारहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.