मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. त्यांना राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देणार असे वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.
माझ्या विभागाकडे राज्यातील चार मेंटल हॉस्पिटल आहेत. चार मेंटल हॉस्पिटलपैकी एका हॉस्पिटलमध्ये आदित्य ठाकरेंसाठी बेड आरक्षित ठेवणार असल्याचे सावंत म्हणाले. तानाजी सावंत यांच्या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. शिवसैनिकांतूून वर्गणी काढून सावंत यांच्यासाठी कृपामाई मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड राखून ठेवणार असल्याचे हाके म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार आव्हानाची भाषा करणा-या आदित्य ठाकरे यांची मानसिक स्थिती चांगली नसून त्यांच्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड ठेवायची व्यवस्था करू असे तानाजी सावंत म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केल्यानंतर आता संतप्त शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. माळशिरस तालुक्यात सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. पन्नास खोके घेऊन सावंत यांचेच डोके ठिकाणावर नसून त्यांनाच मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल, अशा शब्दांत शिवसैनिकांनी आरोग्य मंत्री सावंत यांच्यावर टीका केली आहे.
तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध
तानाजी सावंत हे १० फेब्रुवारी रोजी माढा तालुक्यातील वाकाव या त्यांच्या गावी आले होते. तिथे सावंत परिवाराचे ग्रामदैवत गुंडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागले आहेत.
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे युवा सेनेच्या पदाधिका-यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करत आपला रोष व्यक्त केला आहे. युवासेना तालुका प्रमुख वैभव काकडे यांनी सावंत यांच्यावर निशाणा साधताना पन्नास खोके घेऊन सावंत यांचे डोके ठिकाणावर नसल्याने ते अशी बेताल वक्तव्ये करू लागले आहेत. त्यांनाच मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायची गरज असल्याची प्रतिक्रिया दिली.