मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिवसेना फोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आता शिवसेनेला पुन्हा एकदा सावरण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढताना थेट बंडखोरांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेत असल्याने त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आदित्य ठाकरे कोकणात जाणार आहेत. तेथील दौरा पूर्ण करून ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत.
१ ऑगस्टला संध्याकाळी आदित्य ठाकरे कोल्हापुरात दाखल होतील. आदित्य ठाकरे यांच्या दौ-याचा कार्यक्रम आज संध्याकाळी निश्चित होणार असल्याची माहिती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमध्ये ते बोलत होते.
आदित्य ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा
एक फोटो शेअर करत आदित्य यांनी म्हटले आहे की, माझ्या वडिलांना आणि माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जे मला दररोज प्रामाणिकपणे आणि दयाळूपणे मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन देतात. माझ्याकडून गोष्टी अधिकाधिक चांगल्या होण्यासाठी प्रेरित करतात, असे आदित्य यांनी म्हटले आहे.
बंडखोरांच्या जाहिराती ‘सामना’ने नाकारल्या
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘सामना’त बंडखोर आमदार- खासदारांनी जाहिराती दिल्या ख-या, पण ‘सामना’ने या जाहिराती नाकारल्या. शिंदे समर्थक खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिली आहे. बंडखोरांकडून शुभेच्छांच्या जाहिराती ‘सामना’तून नको अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचा त्यांचा दावा आहे