मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला परळीमध्ये मंगळवारी ३ जानेवारी २०२३ रोजी रात्री अपघात झाला. यामध्ये मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागला. या अपघातात मुंडेंच्या कारचेही मोठे नुकसान झाले. त्यांच्या या अपघातानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती.
बहिणीने भावाची भेट घेतल्यामुळे आणि त्यांचे राजकीय मतभेद जगजाहीर असताना भेटीचे फोटो समोर आले होते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात असलेले राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे. अनेकदा ते सार्वजनिक मंचावरून एकमेकांवर टीका करतात. पण, गरजेवेळी ते नेहमी एकमेकांच्या पाठीशीही उभे असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. यावेळीही राजकीय वैर विसरून पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली.