मुंबई : राज्यातले राजकारण आता कुठे शांत होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पण आता पुन्हा एकदा राजकारणाच्या गोटात खळबळ माजणार का, अशा चर्चा सुरू होऊ लागल्या आहेत. याचे कारण म्हणजे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा झालेली भेट. धनंजय मुंडे यांनी काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट पार पडली.
यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. ही कोणत्या नव्या राजकीय अंकाची नांदी आहे, असाही प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला आहे. मात्र धनंजय मुंडेंनी या शक्यता फेटाळल्या आहेत. उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आपण फडणवीसांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. दोन टोकाचे विरोधक असणा-या पक्षाचे हे नेते पण त्यांची मैत्री राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असते.
मध्यंतरी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जेव्हा सरकार स्थापन केले होते तेव्हा त्या पहाटेच्या शपथविधीमागे धनंजय मुंडे आणि फडणवीस यांची मैत्रीच कारणीभूत होती असे म्हटले जाते. त्या रात्री अचानक मुंडे यांचे नॉट रिचेबल होणे यामागे फडणवीस होते का अशी शंका उपस्थित केली गेली. तर धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणा-या करुणा मुंडे प्रकरणात देखील देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका करायचे टाळले होते.