नवी दिल्ली : रविवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी महिला सन्मान महापंचायतसाठी मोर्चा काढत असताना महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थनार्थ आलेल्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.
याशिवाय दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाच्या ठिकाणाहून तंबू वगैरे जबरदस्तीने हटवले आहेत.
साक्षी मलिकने ट्विट केले की, आमचे आंदोलन संपलेले नाही. पोलिस कोठडीतून सुटका झाल्यानंतर, आम्ही आमचा सत्याग्रह परत जंतरमंतरवर सुरू ठेवू. या देशात हुकूमशाही चालणार नसून महिला कुस्तीपटूंचा सत्याग्रह चालेल, असे त्या म्हणाल्या.
दिल्लीचे स्पेशल सीपी दीपेंद्र पाठक यांनी माध्यमांना सांगितले की, ज्यांनी बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्यांना थांबवण्यात आले असून थेथून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. कोणते उल्लंघन झाले आहे, याची पाहणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
नीरज चोप्रा यांनी दुःख व्यक्त केला
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने दिल्ली पोलिसांच्या महिला कुस्तीपटूंसोबत केलेल्या वागणुकीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, हे पाहून मला दु:ख झाले आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्याचा दुसरा मार्ग असू शकत होता. तर दुसरीकडे साक्षी मलिकने आपला विरोध संपलेला नसून कोठडीतून सुटल्यानंतर थेट जंतरमंतर गाठणार असल्याचे तिने म्हटले आहे.