मुंबई : उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखा शांत आणि संयमी माणूस त्या पदावरून बाजूला झालेला कलाकारांना आवडलेले नाही. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्रतिक्रिया दिल्या.
तुम्हाला अलविदा म्हणताना…हेमंत ढोम
धन्यवाद उद्धव ठाकरे. तुमचा संपूर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणून आमची काळजी घेतली. आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय. धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार.. अशा प्रकारचे ट्विट हेमंतने केले आहे.
चाणक्य आज लाडू खात असतील : प्रकाश राज
‘तुम्ही खूप छान काम केलंत सर! मला खात्री आहे की, तुम्ही ज्या पद्धतीनं राज्य सांभाळलं, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील.. चाणक्य आज लाडू खात असतील; पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहील.. तुम्हाला आणखी बळ मिळो!’
राजकारणामध्ये हार-जीत : आस्ताद काळे
‘महाराष्ट्राच्या राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण.’आस्तादच्या या पोस्टला अनेक नेटक-यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटक-याने कमेंट केली, ‘बरोबर, राजकारणामध्ये हार-जीत होतेच मान्य आहे,पण ठाकरे यांच्यासोबत जे काही झाले ते वाईटच , आपला माणूस हरल्याची जाणीव झाली.’
आरोह वेलणकर
आरोहने ट्विट केले, महाराष्ट्रातील लोकांचा विजय झाला ! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकारसोबत झालं…
परफॉर्मन्स तोच! : केदार शिंदे
केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर ‘तिसरी घंटा झाली.. पडदा सरकला.. नाटक सुरू.. परफॉर्मन्स तोच!!!! ’, अशी पोस्ट केली आहे.
धन्यवाद उद्धव ठाकरेजी : ऊर्मिला मातोंडकर
‘धन्यवाद उद्धव ठाकरेजी. तुमच्या नेतृत्वामुळे आपले राज्य जातीयवाद आणि द्वेषापासून दूर राहिले. तुमचे नेतृत्व अनुकरणीय, धाडसी, प्रतिक्रियात्मक, पारदर्शी, संवादप्रिय होते. जय महाराष्ट्र!’ असे भावनिक ट्विट मातोंडकर यांनी केले आहे.