21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रपुन्हा औरंगाबादचे ‘ छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

पुन्हा औरंगाबादचे ‘ छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

एकमत ऑनलाईन

मुंबई : : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने आपल्या तिस-या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारने घेतलेला औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला.

ठाकरे सरकारने शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने स्थगित केला होता. १४ तारखेला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणे, थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड अशा निर्णयांचा सपाटा लावल्यानंतर आज पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा पुनर्निर्णय घेण्यात आला. लवकरच ठराव करून प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असेही ते म्हणाले.

ठाकरे सरकारने घेतलेल्या औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा. पाटील असे नामांतर करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचे पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली होती. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्षेप घेतला होता. हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकारने आज पुन्हा घेतले आहेत.

सरकार कोसळण्यापूर्वी २९ जून रोजी ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. या बैठकीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात उपस्थित होते.

नामांतराचा घाईत घेतलेला निर्णय चुकला : देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर अवैध असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. नामांतरचा घाईत घेतलेला निर्णय चुकल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. बहुमत चाचणीची सूचना असताना नामांतराचे ठराव मंजूर करण्यात आले, त्यामुळे नव्याने हे ठराव घेण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. फडणवीसांनी सांगितले होते की, कोणत्याही निर्णयांना स्थगिती दिलेली नाही. अल्पमतात असताना नामांतराचे निर्णय घेणे अयोग्य आहे. ज्या सरकारकडे बहुमत ते सरकार निर्णयांना मंजुरी देईल. औरंगाबादचेछत्रपती संभाजीनगर होणारच, असे फडणवीसांकडून स्पष्ट करण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या