22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeसंपादकीयपुनश्च हरि ओम् !

पुनश्च हरि ओम् !

एकमत ऑनलाईन

‘एकमत’चा आज ३१ वा वर्धापनदिन! लोकनेते विकासरत्न मा. विलासरावजी देशमुख यांनी निव्वळ सामाजिक बांधीलकीच्या नेणिवेतून १९९१ साली लातूरसारख्या ग्रामीण भागात ‘एकमत’चे रोपटे लावले आणि भक्कम पाठबळ देऊन रुजवलेही. यामुळेच विपरीत परिस्थितीवर मात करत, अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत ‘एकमत’ भक्कमपणे रुजला व आज तीन दशकांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून चौथ्या दशकाच्या प्रवासाला सज्ज झाला आहे. ‘एकमत’च्या या यशस्वी वाटचालीचे श्रेय अर्थातच मा. विलासरावजी देशमुख यांना व त्यांच्या पश्चात मा. वैशालीताई देशमुख व संपूर्ण देशमुख कुटुंबियांना आहे. मा. विलासरावजी देशमुख यांनी ‘एकमत’ची उभारणी करताना त्याकडे व्यवसाय म्हणून न पाहता सामाजिक बांधीलकी म्हणून वृत्तपत्र चालविण्याचा मूलमंत्र दिला होता व तो खोलवर रुजवलाही! त्यामुळे भलेही ‘एकमत’चे अर्थकारण इतर स्पर्धक वृत्तपत्रांप्रमाणे भरभक्कम झाले नाही.

मात्र, आपल्या मातीशी घट्ट नाळ जोडण्यात ‘एकमत’ नक्कीच यशस्वी ठरला आहे. ‘एकमत’ हे आपल्या भागातील जनतेचा आवाज बनले पाहिजे, जनतेचे हक्काचे व्यासपीठ बनले पाहिजे ही मा. विलासरावजी देशमुख यांची कळकळीची इच्छा होती. त्यांची ही इच्छाच ‘एकमत’च्या प्रवासाचा मूलमंत्र ठरली व त्याच मूलमंत्रावर ‘एकमत’ने आजवर आपली वाटचाल कायम ठेवली आहे व यापुढचा ‘एकमत’चा प्रवास याच मूलमंत्रावर व तत्त्वावर सुरू राहील. या वाटचालीत वृत्तपत्र क्षेत्रात प्रचंड स्थित्यंतराचा, उलथापालथीचा व बदलांचा काळ असतानाही ही सगळी स्थित्यंतरे, बदल स्वीकारतानाही मा. विलासरावजी देशमुख यांनी रुजवलेल्या मूलमंत्रावरून ‘एकमत’ तसूभरही ढळला नाही.

त्यामुळेच आजही ‘एकमत’ व्यावसायिक फायद्या-तोट्यापेक्षा जनतेशी असणा-या बांधीलकीला असणारे सर्वोच्च प्राधान्य टिकवून आहे. वाचकांच्या मनातली ‘विश्वासार्हता’ टिकवून आहे. अर्थात तीन दशकांचा हा प्रवास सहज-सोपा नक्कीच नव्हता. अनेक व्यावसायिक संकटे, चढ-उतार, अडथळ्यांना सामोरे जात व त्यावर मात करत ‘एकमत’ने हा अभिमानास्पद, गौरवशाली टप्पा पार केला आहे. १९९१ साली लातूरसारख्या ग्रामीण भागात मोडणा-या शहरातून विभागीय वृत्तपत्र सुरू करणे व ते वाचकप्रिय करून रुजवणे हा खरे तर त्याकाळचा उलटा किंवा प्रवाहाविरुद्धचा प्रवासच! मा. विलासरावजींच्या प्रेरणेने व भक्कम पाठबळाने तो सुरू झाला व यशस्वीही झाला.

एवढेच नव्हे तर तीन दशकांचा टप्पा पार करून चौथ्या दशकाचा प्रवास सुरू करणारा गौरवशाली व अभिमानास्पदही ठरला आहे. मनुष्यबळ ते अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामुग्रीचा अभाव अशा अनंत अडचणींचा सामना करत ‘एकमत’चा हा प्रवास पार पडला आहे. त्रिदशकपूर्तीचा टप्पा गाठताना या प्रवासात कोरोनाच्या जागतिक संकटाची भर पडली. कोरोनाने जग कुलूपबंद केले, ठप्प केले. त्याचा परिणाम वृत्तपत्रसृष्टीवरही झाला. वृत्तपत्राचे अर्थकारण कोलमडले. अशा विपरीत परिस्थितीला सामोरे जात व या संकटावर मात करत ‘एकमत’ तगला आणि तरलाही! या संकटकाळात ‘एकमत’ला अर्थकारण सांभाळण्यासाठी अनेक कटू निर्णय घ्यावे लागले पण वाचकांचा, जाहिरातदारांचा, हितचिंतकांचा भक्कम पाठिंबा, विश्वास व पाठबळाच्या जोरावर आणि ‘एकमत’मधील सर्व सहका-यांनी दिलेल्या अमूल्य सहकार्याने ‘एकमत’ने या जागतिक संकटावरही यशस्वी मात केली.

आता ३१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आम्ही ‘पुनश्च हरि ओम्’ करतो आहोत. कोरोनाने ठप्प केलेले उपक्रम पुन्हा त्याच उत्साहाने सुरू करत आहोत. आपल्या भागात विविध क्षेत्रांत भरीव योगदान देऊन आपल्या भागाच्या विकासात, लौकिकात भर घालणा-यांप्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम हा त्यातलाच एक उपक्रम. आजच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ‘कृतज्ञता सन्मान सोहळा’ उपक्रमाचाही पुनश्च हरि ओम् करत आहोत. समाजात सकारात्मकता पेरण्याचा, रुजविण्याचा हा ‘एकमत’चा प्रयत्न आहे, जो वाचकांच्या पाठबळाने व पाठिंब्याने सुरू आहे व तो पुढेही असाच अखंडित सुरू राहील ही आशा नव्हे तर खात्रीच! दरम्यान कोरोना संकटात थिजून न जाता या संकटाचा नवे आव्हान म्हणून सामना करण्याचा निश्चय ‘एकमत’च्या टीमने केला होता.

कोरोना काळात वाचकांची गैरसोय टाळण्यासाठी ‘एकमत’ने dainikekmat.com हे पोर्टल कार्यान्वित करून ’एकमत’च्या वाचकांना सर्व आवृत्त्यांचे ई-पेपर तसेच ताज्या बातम्या तात्काळ उपलब्ध करून दिल्या. ‘एकमत’च्या या पोर्टलला केवळ मराठवाडा, महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून भरभरून प्रतिसाद मिळाला. अत्यंत अल्पावधीत ‘एकमत’चे पोर्टल वाचकप्रिय झाले असून दररोज ४० ते ५० हजार वाचक नियमितपणे पोर्टलला भेट देतात हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते. या पोर्टलवरील मजकुराचा दर्जा उत्तरोत्तर वाढवत नेण्यास व वाचकांना दर्जेदार सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर ‘एकमत’ने purogamivicharancheekmat हे यूट्यूब चॅनल कार्यान्वित करत वाचकांना व्हीडीओद्वारे लाईव्ह बातम्या उपलब्ध करून देण्याचाही उपक्रम सुरू केला आहे व या उपक्रमासही वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.

थोडक्यात या उपक्रमाने ‘एकमत’ आता ‘लोकल’ न राहता ‘ग्लोबल’ बनला आहे. अर्थात हे यश वाचकांच्या ‘एकमत’वरील विश्वास, प्रेम व पाठिंब्यामुळेच आहे. आम्ही त्यासाठी कायम वाचकांच्या ऋणात राहू इच्छितो! कोरोना संकटापूर्वीचे ‘एकमत’चे अनेक वाचकप्रिय उपक्रम कोरोनातील टाळेबंदीने ठप्प झाले. ३२व्या वर्षाची वाटचाल सुरू करताना या सर्व वाचकप्रिय उपक्रमांचाही पुनश्च हरि ओम् करण्याचा आमचा मानस आहे. या उपक्रमांना वाचकांचा पूर्वीप्रमाणेच उदंड प्रतिसाद मिळेल, ही आशा नव्हे तर खात्रीच! नव्या वाटा आपल्याशा करतानाच वृत्तपत्राची पारंपरिक चौकटही विस्तारण्याचा आमचा प्रयत्न सदोदित सुरूच राहील. वाचक, जाहिरातदार, हितचिंतक यांच्या प्रेम, पाठिंबा, विश्वास व पाठबळानेच ‘एकमत’ला संकटात डगमगून न जाता त्यावर मात करण्याचे बळ सदोदित प्राप्त झाले आहे. वाचकांचा भक्कम पाठिंबा व विश्वास हीच ‘एकमत’ची शिदोरी आहे.

याच शिदोरीच्या बळावर कुठल्याही वृत्तपत्राच्या प्रवासात अत्यंत अभिमानास्पद व गौरवशाली असणारा तीन दशकांचा टप्पा पार करून चौथ्या दशकातल्या दमदार वाटचालीस ‘एकमत’ सज्ज आहे. ही वाटचालही मा. विलासरावजी देशमुख यांनी ‘एकमत’ला दिलेल्या मूलमंत्रावर कायम रहात किंबहुना तो वृद्धिंगत करत सुरू राहील. ‘एकमत’ आपल्या भागातील जनतेच्या आशा, अपेक्षा, इच्छा, आकांक्षांचे हक्काचे व्यासपीठ आहे व यापुढेही ते असेच बुलंद होत राहील. ‘एकमत’ कायम जनतेसोबतची आपली बांधीलकी सर्वोच्च प्राधान्याने कायम ठेवेल, याची या निमित्ताने ‘एकमत’ परिवाराकडून वाचकांना ग्वाही देतो. ‘एकमत’चा हा प्रवास वाचक, जाहिरातदार, हितचिंतकांच्या भक्कम पाठबळाच्या बळावरच सुरू आहे.

यापुढेही ‘एकमत’चे वाचकांशी असणारे स्नेहबंध व विश्वासाचे नाते उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाईल, ही आशा नव्हे तर खात्रीच! वाचक, जाहिरातदार, हितचिंतक यांचे पुनश्च एकवार ‘एकमत’ परिवाराकडून मन:पूर्वक आभार! आम्ही आपले ऋणी आहोत व कायम आपल्या ऋणातच राहू इच्छितो. धन्यवाद! चौथ्या दशकातील वाटचाल सुरू करताना वाचकांच्या आशा-आकांक्षांना हक्काचे व्यासपीठ म्हणून विविध मार्गांनी न्याय देण्याचा आमचा सदोदित प्रयत्न राहीलच. त्यासाठीचे अनेक नवे उपक्रमही ‘एकमत’ वेळोवेळी हाती घेईल, याची या निमित्ताने ‘एकमत’ परिवार ग्वाही देत आहोत. कोरोना संकटानंतरचा ‘एकमत’चा ‘पुनश्च हरि ओम्’ चा गजर करत सुरू केलेला हा प्रवास आपल्या सर्वांच्या प्रेम, पाठिंबा, विश्वास व भक्कम पाठबळाच्या जोरावर जोमाने व यशस्वीपणे अखंड सुरूच राहील, ही आशा नव्हे तर खात्रीच!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या