अजिंक्यचे क्षेत्ररक्षण कौतुकास्पद : रैना

  400
  अद्याप मुंबईत सरावाला परवानगी दिलेली नाही

  नवी दिल्ली : सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघात युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ या तरुण खेळाडूंनी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवला. धावा अडवणे, कठीण झेल घेणे हे क्षेत्ररक्षकांचे काम मानले जाते. सध्याच्या भारतीय संघातही रवींद्र जडेजा, मनिष पांडे, विराट कोहली, अजिंक्य रहाणे हे सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानले जातात. मात्र भारतीय संघापासून गेली काही वर्षे दूर असलेल्या सुरेश रैनाच्या मते अजिंक्य रहाणेचे झेल पकडण्याचे तंत्र सर्वोत्तम आहे.

  Read More  जळगाव : मृत व्यक्तीच्या संपर्कात आल्याने 15 जण कोरोना पॉझिटिव्ह

  ‘‘अजिंक्यचे झेल पकडण्याचे तंत्र सरस आहे. त्याच्यात एक वेगळीच ऊर्जा आहे, त्याचे शरीर कोणत्याही दिशेला झुकते असे मला वाटते. तो स्लिपमधला आताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. तो स्टम्पमागून फलंदाजाचा पवित्रा आणि हालचाल ओळखतो. फलंदाज आणि स्लिपमध्ये क्षेत्ररक्षकामधलं अंतर हे फार लांब नसतं, त्यामुळे तुम्ही योग्य अंदाज लावणं हे महत्त्वाचं असतं.’’ एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रैना बोलत होता. अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आहे. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनीही याआधी अजिंक्यचे कौतुक केले होते.

  ज्यावेळी अजिंक्य एखादा झेल सोडतो तो माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का असतो असे श्रीधर म्हणाले होते. दरम्यान केंद्र सरकारने मैदानं खुली करण्यास परवानगी दिली असली तरीही मुंबई रेड झोन एरियात येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने अद्याप मुंबईत सरावाला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेसोबत रोहित शर्मा या खेळाडूंना सरावासाठी वाट पहावी लागणार आहे.