मुंबई : ‘माझ्याकडे अजित पवार स्वत:हून आले होते’ असे वक्तव्य करत राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल खुलासा केला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेली एक महत्त्वाची घटना ठरली आहे. या घटनेबाबत अजूनही विविध खुलासे होत आहेत.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच एका वाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये कोश्यारींनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, दोन मोठ्या पक्षांचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारले की, तुमच्याकडे बहुमत असेल तर ते सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्यांचे पत्र दाखवले. मग शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. पुढे कोर्टात आव्हान दिल्यावर त्यांनी माघार घेत राजीनामा दिला.
कोश्यारी पुढे म्हणाले, राज्यपाल कधीही स्वत:हून शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात, तेच बोलवतात. मी ज्यांना शपथ दिली, त्यांनी याबद्दलचे सत्य सांगितले आहे.
त्यावेळी तुमच्यावर कोणाचा दबाव होता का, असे विचारले असता कोश्यारी म्हणाले, माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. त्यांनी मला वेळ मागितला, मग मी त्यांना वेळ दिला. काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले. ते म्हणाले की वेळ दिली तर आमदारांचा घोडेबाजार होईल. मग मी बहुमत सिद्ध करण्याचा कालावधी कमी केला. यात माझी भूमिका संदिग्ध कशी काय? सकाळी ८ वाजता शपथविधी झाला तरी लोक त्याला पहाटेचा शपथविधी म्हणतात. याला काय अर्थ आहे?