पुणे : भारताविरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात श्रीलंकेने १६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने २०६ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल भारताला २० षटकात १९० धावा करता आल्या. या विजयासह श्रीलंकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दोन्ही संघातील तिसरी आणि अखेरची मॅच राजकोट येथे होणार असून या सामन्यात मालिकेचा फैसला होणार आहे. परंतु आजच्या सामन्यात अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यांनी जोरदार फटकेबाजी केली. परंतु या दोघांची खेळी विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.
श्रीलंकेने दिलेल्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. स्फोटक फलंदाज ईशान किशन फक्त २ धावांवर बाद झाला. दुस-या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर भारताची पहिली विकेट पडली. त्यानंतर शुभमन गिल अखेरच्या चेंडूवर बाद झाला. यामुळे टीम इंडियाची अवस्था २ बाद २१ अशी झाली. गिलच्या पाठोपाठ राहुल त्रिपाठी ५ धावांवर बाद झाल्याने टीम इंडियाची अवस्था ३ बाद २१ अशी झाली.
मैदानावर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या ही उपकर्णधार आणि कर्णधाराची जोडी मैदानावर होती. ही जोडी संघाला सावरेल, असे वाटत होते. पण हार्दिकदेखील १२ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला दीपक हुड्डादेखील लवकर माघारी परतला. त्यामुळे ५७ धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता.
श्रीलंकेने सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. मैदानावर सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल ही जोडी होती. सामना भारताच्या हातातून निसटला आहे असे वाटत असताना अक्षर पटेल गोलंदाजांवर तुटून पडला. अक्षरने लंकेच्या गोलंदाजांची अशी धुलाई केली की ज्याचा विचार कोणी केला नाही. त्याने फक्त २० चेंडूत ५० धावा केल्या. दुस-या बाजूला सूर्यकुमारनेदेखील चौकार-षटकार सुरू केले. त्याने ३३ चेंडूत ५० धावा केल्या. ही जोडी भारताला विजय मिळवून देईल, असे वाटत असताना सूर्यकूमार ५१ धावांवर बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार मारले. सूर्यकुमार बाद झाल्यानंतरदेखील अक्षरने आशा सोडली नव्हती. त्याला अनपेक्षित साथ मिळाली ती गोलंदाज शिवम मावी याची. पण अखेरच्या षटकात जोरदार फटके मारण्यात अपयश आले. त्यामुळे अक्षरला विजय साकारता आला नाही.