चिंतेचे वातावरण : एकूण रूग्णसंख्या ८२२ इतकी झाली ; पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे सोलापुरात दाखल
सोलापुर: सोलापुरात काल रात्री एकाचवेळी ८१ करोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर सोलापुरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत पुन्हा ७४ नव्या रूग्णांची पडल्यामुळे अधिकच भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत ७२ रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. एकूण रूग्णसंख्या ८२२ इतकी झाली आहे. मात्र तरीही करोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्याही ३२१ वर गेल्यामुळे तेवढाच दिलासा मिळाला आहे.
आज, शुक्रवारी सकाळी करोनाशी संबंधित १६६ चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात ६० पुरूष व १४ महिलांसह ७४ पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. काल रात्री ८१ रूग्ण सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा ७४ रूग्णांची भर पडल्यामुळे सोलापूरकरांसाठी हा धोक्याची घंटा ठरली आहे. गेल्या पाच दिवसांतील करोना संकटाची स्थिती पाहिली असता २४ मे पासून आज सकाळपर्यंतचा रूग्णांची संख्या २५७ इतकी झाली आहे. तर मृतांची संख्याही २६ झाल्याचे दिसून येते.
Read More केवळ 1 मिनिटांत असं होणार कोरोनाचं निदान
सध्या आणखी सुमारे सहाशे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. एकमेकांच्या थेट संपर्कात आल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येते. दरम्यान, या गंभीर परिस्थितीत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे सोलापुरात दाखल झाले आहेत.