लातूर : प्रतिनिधी
शासनाने मद्यविक्री करण्यासाठी दुकाने उघडण्याची परवानगी देताच लातूर जिल्ह्यात दारू दुकानांच्या समोर मद्यपींच्या लागलेल्या रांगा पाहण्यासारख्या होत्या़ मात्र शासनाच्या नियमाचे पालन न झाल्याने मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिले होते़ त्यानंतर पुन्हा शासनाने ऑनलाईन घरपोच मद्यविक्री करण्यासाठी वाईन व बिअर शॉपींना परवनगी दिली आहे़ शुक्रवारपासून लातूर जिल्ह्यातील परवानाधारक मद्यपींना घरपोच सेवा मिळू लागली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागास दररोज देशी मद्यापासून ४० लाख रुपये व ५० लाख रुपये विदेशी व बिअर मद्यापासून असा दररोज लातूर जिल्ह्यातून सरासरी १ कोटी रुपयांचा तर वर्षाला ३५० कोटी रुपये महसूल मिळतो. लातूर जिल्ह्यात १४० परवानाधारक बिअर शॉपी व १० वाईन शॉपी आहेत. त्यापैकी उदगीर तालुक्यातील १० व त्यांच्या परिसरातील ५ अशा १५ बिअर शॉपींना कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे मद्यविक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही़ इतर ठिकाणी ज्या बिअर शॉपी व वाईन शॉपी आहेत़ त्यांना आपला व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत शटर बंद करून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे़ शुक्रवारपासून लातूर जिल्ह्यात घरपोच मद्य विक्रीस सुरुवातही झाली आहे.
Read More मद्यप्रेमींसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध
शासनाने दि़ ३ मे रोजी दिलेल्या सूचनेनुसार दारू दुकाने दि़ ४ मे रोजी उघडली़ दारू दुकानांच्या समोर पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या़ ज्यांच्यासाठी शासनाने दारूची दुकाने उघडली त्यांनीच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविल्याने जिल्हाधिकारी यांनी दुसºयाच दिवशी दारू दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या़ पुन्हा शासनाने दि़ ११ मे रोजी घरपोच विदेशी मद्य व बिअर देण्यासाठी सूचना केल्या तसेच आयुक्तांनी दि़ १३ मे रोजी केलेल्या सूचनेनुसार वाईन व बिअर शॉपी परवानाधारकांना घरपोच मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
मद्यासाठी करावी लागणार नोंदणी
मद्य मागणी करताना मद्य सेवन परवाना असणे आवश्यक आहे. परवाना नसल्यास मद्यपीला दिवसाचा परवाना त्यांच्या ऑर्डर सोबत दिला जाणार आहे़ एका वेळी जास्तीत जास्त २ हजार एमएल एवढीच सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ऑर्डर करता येईल. लातूर जिल्ह्यातील परवानाधारक वाईन व बिअर शॉपीचालकांनी आपल्या दुकानाच्या समोर मोबाईल नंबर, व्हॉट्सअॅप नंबर लावणे आवश्यक आहे़ ज्या व्यक्तींना मद्य घ्यावयाचे त्यांना सदर नंबरवर मद्याची ऑर्डर करणे सोपे जाणार आहे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही https://exciseservices.mahaonline.gov.in व https://stateexcise.maharashtra.gov.in ही गुगलची लिंक उपलब्ध करून दिली आहे तसेच महाराष्ट्र दारू प्रतिबंध अधिनियमात नमूद तरतुदी लागू राहणार असून त्याचा भंग झाल्यास योग्य ती कारवाईदेखील होणार आहे़
ग्राहकांकाडून सेवा शुल्क घेऊ नये
जिल्ह्यातील वाईन व बिअर शॉपीधारकांनी मद्य मागणीनुसार घरपोच देण्यासाठी मद्य मागणी करणा-या ग्राहकांच्या करून सेवा शुल्क घेऊ नये़ एका डिलिव्हरी व्यक्तीला एका वेळी १२ व्यक्तींचे (२४ युनिट) फक्त २ बॉक्स मद्य घेऊन जाता येणार आहे़ जी व्यक्ती मद्याची ऑर्डर घेऊन येणार आहे़ ती ऑर्डर हातात पडल्यानंतरच पैसे अदा करावेत तसेच वाईन व बिअर शॉपीधारकांनी शटर बंद करूनच घरपोच मद्याची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे़
पहिल्या दिवशी केवळ ३ ऑर्डर पूर्ण
जिल्ह्यातील वाईन व बिअर शॉपीतून मद्याची मागणी करणाºया जिल्ह्यातून २ हजार ७५ ऑर्डर आल्या़ त्यापैकी ३ व्यक्तींनाच ६ बल्क लिटर मद्याचा पुरवठा घरपोच करण्यात आला़ मद्य घरपोच डिलिव्हरी करणा-या व्यक्तींची आरोग्य चाचणी करून लातूर विभागातील ६८ जणांना तर उदगीर विभागातील १७ जणांना ओळखपत्र देण्यात आले असून शनिवारपासून मद्य घरपोच विक्रीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी माहिती लातूरचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगोजे यांनी दिली़