22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंकडून नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त;  नवी कार्यकारिणी जाहीर करणार

राज ठाकरेंकडून नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त;  नवी कार्यकारिणी जाहीर करणार

एकमत ऑनलाईन

नागपूर: नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही सांगितले.
राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर १६ वर्षे झाली तरी विदर्भात पक्षाचे अस्तित्व नाही आहे.

विदर्भात अनेक तरुण-तरुणी मनसेत काम करण्यास इच्छूक आहेत. त्यांना संधी देण्यात येईल. नागपूर महानगरपालिकेत अनेक दशकांपासून भाजपची सत्ता आहे. प्रस्थापित सत्तेला आव्हान दिल्याशिवाय मोठं होता येत नाही. त्यामुळे आम्ही नागपुरात भाजपविरुद्ध लढू आणि पक्षाला नक्कीच नागपूरकर साथ देतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

सुरुवातीपासूनच विदर्भाकडे दुर्लक्ष!
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मागील १५ वर्षांत फक्त १५ सभा जरी विदर्भात घेतल्या असत्या तरी पक्षावर ही वेळ आली नसती असे विदर्भातील पदाधिका-यांचे म्हणणे आहे. मनसेला विदर्भात पुन्हा पुनजिर्वित करण्यासाठी राज ठाकरे आज नागपुरात दाखल झाले. नागपूरच नव्हे तर अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यालाही ते भेटी देणार आहे. सर्व पदाधिका-यांच्या बैठकी घेणार आहेत. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर येथील महापालिका निवडणुकीचा आढावा घेणार आहेत.

आम्ही मनसेत टिकून आहोत ही पक्षासाठी उपलब्धी
राज ठाकरे यांचे विश्वासू असलेले संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि विदर्भातील नेते राजू उंबरकर हे तीन दिवसांपूर्वीच नागपूरला दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आनंद एंबडवार हे सुद्धा आले आहेत. नागपूर, अमरावती आणि चंद्रपूरच्या पदाधिका-यांच्या त्यांनी बैठका घेतल्या. त्यांच्याकडून राजकीय परिस्थिती जाणून घेतली. मुंबईवरून आलेले पदाधिकारी बैठकांमध्ये पंधरा वर्षांत तुम्ही पक्षासाठी काय केले, पक्ष वाढला का नाही, इतकी अधोगती का झाली असे सवाल करीत आहेत. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते फारच अस्वस्थ झाले आहेत. त्यांना काय उत्तर द्यावे हेच सूचत नाही. उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमतही नाही. जे काही पदाधिकारी व कार्यकर्ते मनसेत टिकून आहेत हीच मोठी पक्षासाठी उपलब्धी आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

विदर्भासह नागपूरही वा-यावर
संघभूमी असल्याने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात नागपूरचे महत्त्व आहे. मात्र आजवर मनसेच्या एकाही वरिष्ठ नेत्यांने विदर्भात लक्ष घातले नाही. पाठबळ दिले नाही. निवडणुकीची तयारी करून घेतली नाही आणि कोण जिंकले, पराभूत झाले याची साधी विचारणाही केली नाही. मुंबई , पुणे आणि नाशिक हीच शहरे मनसेच्या अजेंड्यावर होती. त्यामुळे विदर्भात कोणीच लक्ष घातले नाही. पंधरा वर्षांत झालेल्या विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकात जरी मुंबईतून लक्ष घातले असते आणि राज ठाकरे वरचेवर येत राहिले असते तरी पक्ष जिवंत राहिला असता. ही अवस्था झाली नसती असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या