भारतासाठी २०२० साल हे संकटसत्राचे व जनतेची कठोर परीक्षा घेणारे ठरते आहे़ मागच्या तीन महिन्यांपासून अवघा देश कोरोना महामारीविरुद्ध तन, मन, धनाने लढतो आहे़ कोरोनाने केवळ आरोग्य संकटच निर्माण केलेले नाही तर त्यासोबतच सर्व व्यवहारही ठप्प झाल्याने प्रचंड मोठे अर्थसंकटही निर्माण केले आहे़ लाखो-करोडो लोकांचा रोजगार बुडालाय, उद्योगधंद्यांची वाट लागलीय! ही परिस्थिती कधी सुरळीत होणार? कोरोनाने पुढे काय होणार? याचीच शाश्वती नाही की, अंदाज बांधणेही शक्य होत नाही.
अनिश्चित भविष्याच्या या स्थितीने सर्वसामान्य जनतेचे मनही आता सैरभैर झालेय, अस्वस्थ झालेय! तज्ज्ञांकडून जे विविध अंदाज व्यक्त होतायत, ज्या शक्यता व्यक्त होतायत त्याने प्रत्येकाच्याच मनात हलकल्लोळ निर्माण केलाय व त्यातून सार हेच निघते आहे की, कोरोना संकटाने निर्माण झालेली स्थिती ही ‘न भूतो न भविष्यति’ अशीच आहे! जगाचे व जगण्याचे सगळे स्वरूपच बदलून जाण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. देश व देशातील जनता प्राणपणाने या संकटाशी लढत असतानाच त्याला थोपविण्यात किंवा रोखण्यात मात्र म्हणावे तसे यश येताना दिसत नाही़ सरकार व प्रशासन आकडेवारीचे जंजाळ तोंडावर मारून व इतर देशांच्या भयावह आकडेवारीशी तुलना करून तोंडे बंद करण्याचा व स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा कितीही प्रयत्न करत असले तरी मागच्या महिन्यापर्यंत महानगरे व मोठ्या शहरांपर्यंत तसेच उच्चभू् वर्गापर्यंत सीमित असणारा कोरोनाचा संसर्ग आता झपाट्याने ग्रामीण व निमशहरी भागांपर्यंत पोहोचला आहे़ कष्टकरी व गोरगरीब वर्गापर्यंत पोहोचला आहे आणि आपला विळखा घट्ट करतोय, हे वास्तवच!
त्यासाठी देशाच्या फाळणीनंतर झालेले सर्वांत मोठे स्थलांतर, हे ‘सरकारी कारण’ अर्थातच तयार आहेच़ मात्र, हे कारण सांगताना सरकार व प्रशासनाला परिस्थितीचे आकलन करण्यात, ती सांभाळण्यात व त्यावर नियंत्रण मिळविण्यात सपशेल अपयश आले, हे ही ‘ब्लेम गेम’ रंगवणाºया यंत्रणेला मान्य करावे लागेलच! या अपयशाच्या परिणामी आजवर बºयापैकी कोरोनापासून सुरक्षित राहिलेला मराठवाड्यासारखा भागही दररोजच रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालल्याने अक्षरश: हादरून गेलाय! शनिवारपर्यंत मराठवाड्यातील कोरोना बळींच्या संख्येने ‘हाफ सेंच्युरी’ केली आहे तर रुग्णसंख्येने रोजच नवा विक्रम स्थापित करण्यास सुरुवात केली आहे.
असो! एकंदर परिस्थिती पाहता निष्कर्ष हाच की, कोरोनाचा लढा काही लवकर आटोपणारा नाही ही लढाई दीर्घकाळ लढावी लागणार आहे आणि देश निकराने हा लढा देतोही आहे़ अशा या संकटकाळात ‘अम्फान’ वादळाच्या रूपाने देशावर आणखी एक अस्मानी संकटाची भर पडली आहे़ बंगालच्या उपसागरात आलेल्या या प्रलयंकारी चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन राज्यांमध्ये अक्षरश: हाहाकार उडविला आहे़ या चक्रीवादळाची भीषणता एवढी भयानक आहे की, जणू त्याने मानवाने निर्माण केलेले सर्वकाही जमीनदोस्त करण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा चंगच बांधला होता की काय, अशीच शंका येते़ हवामान खात्यानेही दशकातील सर्वांत शक्तिशाली वादळ, असेच त्याचे वर्णन केले आहे़ हे वादळ प्रत्यक्ष भूप्रदेशावर धडकण्यापूर्वी त्याचा प्रलयंकारी वेग व शक्ती दोन्ही मंदावले होते तरी प्रति तास १८५ किलोमीटर या वेगाने ते धडकले आणि जेथे धडकले तेथे सर्वकाही होत्याचे नव्हते करून गेले.
या वादळाने आपल्यासोबत १५ फूट उंचीच्या महाकाय लाटा आणल्या़ वादळाची पूर्वसूचना मिळाल्याने सरकार, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत सुमारे पाच लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविल्याने जीवितहानीचा आकडा खूप कमी राहिला असला तरी शनिवारी प़ बंगालमध्ये तो ८५ वर पोहोचला होता़ या वादळाने हजारो घरे पडली आहेत, वृक्ष उन्मळले आहेत़, विजेचे खांब पडले आहेत, रस्ते वाहून गेले आहेत़ दगड-मातीची हजारो घरे तर अक्षरश: वादळात विरघळून गेली आहेत़ झोपड्या, तात्पुरते निवारे व कच्ची घरे यांची झालेली वाताहत तर विचारायला नको! अक्षरश: या वादळाच्या रूपाने प़ बंगाल व ओडिशा या राज्यांना प्रलयच भोगावा लागला आ़हे़ मदतकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असले तरी निसर्गाच्या या प्रलयंकारी अवतारासमोर ते तोकडेच ठरते आहे़ त्यामुळे ‘अम्फान’च्या बळींची संख्या आणखी वाढण्याचीच शक्यता आहे.
निसर्गाच्या या रौद्ररूपाची ‘वॉररूम’मध्ये माहिती घेत असताना ती ऐकून प़ बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तोंडून ‘सर्वनाश’ अशी प्रतिक्रिया बाहेर पडली़ वादळाच्या महाभयानक तडाख्याचे रूप पाहिल्यावर ती प्रतिक्रिया तंतोतंत खरी ठरावी! कोरोनाने मानवजातीला घरातच ठाणबंद करून टाकल्याच्या या अत्यंत अवघड काळात या वादळाच्या तडाख्यापासून बचावासाठी लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम महाकठीणच! प्रशासन, सरकारने ते यशस्वीपणे पार पाडले खरे पण त्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईचा मूलमंत्र असलेल्या सोशल डिस्टन्सिंगला पुरता हरताळ फासला गेला आहे़ त्याचे अपरिहार्य परिणाम आता प़ बंगाल व ओडिशा या राज्यांमधील जनतेलाच नव्हे तर आपला शेजारी असलेल्या बांगलादेशातील जनतेलाही भोगावा लागणार आहे़ बांगलादेशात तर या वादळापासून बचावासाठी सुमारे २४ लाख लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
चक्रीवादळासोबत आलेल्या तूफानी पावसाने या भागात पाणीच पाणी झाल्याने साथरोगांचाही उद्रेक होण्याची शक्यता आहेच़ त्यामुळे केवळ कोरोनाचा संसर्ग वाढण्याशीच नव्हे तर त्याच्या सोबतीला येणाºया इतर साथरोगांच्या संकटाशीही सरकार, प्रशासन व जनतेला आता लढावे लागणार आहे़ अगोदरच प़ बंगालमधील कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविताना सरकार व प्रशासनाची दमछाक होतेय, त्यात या ‘अम्फान’च्या तडाख्याने परिस्थिती आणखी बिकट करून टाकली आहे़ पंतप्रधान मोदी यांनी या भागाची हवाई पाहणी केल्यानंतर तातडीने प़ बंगालसाठी एक हजार कोटींची तर ओडिशासाठी ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी जो विध्वंस झालाय तो पाहता ती तोकडीच आहे, हा ममता दीदींचा दावा सत्यच आहे़ ममता दीदींनी १ लाख कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे़ त्यांची ही मागणी मान्यही व्हायला हवी़ मात्र, ही मागणी करताना त्यांनी प़ बंगालचेच केंद्राकडून ४५ हजार कोटी येणे थकित असल्याचे टुमणे लावून अकारण त्यात राजकारण आणले आहे.
यामुळे संकटातील जनतेला तातडीने मदत व दिलासा मिळण्याचे दूरच राहून राजकीय आखाडा रंगतो आहे, चिखलफेक सुरू झाली आहे़ दक्षिण परगणा भागात भेट देण्यासाठी निघालेल्या भाजप नेते दिलीप घोष यांना पोलिसांनी अडविल्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात या प्रचंड संकटाच्या काळातही तूफान चिखलफेक सुरू झाली आहे व आरोप-प्रत्यारोपांचा आखाडा रंगला आहे़ संकटकाळातही राजकारण्यांची ही खोड हे खरोखरच सर्वसामान्य जनतेचे दुर्दैवच आहे़ राजकारण्यांच्या या न जाणा-या खोडीने बिचारी असहाय्य जनता वा-यावर पडते. जनतेला हकनाक अपार त्रासाला, वेदनांना सामोरे जावे लागते, मदतीसाठी आक्रोश करावा लागतो़ असा आक्रोश आता प़ बंगालमध्ये सुरूही झाला आहे़ मात्र, ना ममता दीदींना, ना भाजप नेत्यांना त्याची फिकीर आहे़ ते डाव-प्रतिडावात रंगले आहेत व राजकीय फायद्या- तोट्याची गणिते मांडत आहेत़ याला आता जनतेचे दुर्दैव म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणावे? या कसोटीच्या काळाला माणूस म्हणून परस्पर सहकार्याने कसे सामोरे जायला हवे, माणसे कशी वाचवायला व सावरायला हवीत, याचे धडेच देशातील राजकारण्यांना देण्याची वेळ आता आली आहे, हे मात्र निश्चित!