मुंबई : वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती गुलदस्त्यात असली, तरी या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत जास्त न ताणता भूमिका जाहीर करावी, असे ते म्हणाले.
‘‘राजकारणात भूमिका मागे-पुढे करावी लागते. त्याशिवाय प्रकाश आबेडकरांची कोणाशी युती होईल, असे वाटत नाही. एकनाथ शिंदेंबाबत त्यांचे मत त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत जास्त न ताणता योग्य ती भूमिका तातडीने जाहीर करावी. आगामी महापालिकास, नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीत एक वेगळा मेसेज त्यांना देता येईल. याबाबत ते लवकरच भूमिका जाहीर करतील’’, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.
पुढे बोलताना त्यांनी संजय राऊतांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ‘मी मागेही अनेकदा सांगितलं की संजय राऊत यांना आता उपचाराची गरज आहे. गेल्यावेळी ते म्हणाले होते की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दावोसला जाऊन बर्फ खेळणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एका चांगल्या कामाला जात असतील तर त्यांच्यावर टीका करायची, हा त्यांचा स्वभाव आहे. १९ तारखेला पंतप्रधान येणार आहेत यावेळी मोठ्या प्रमाणात विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. अडीच वर्षांत जी कामे थांबली होती, ती आता मार्गी लागणार आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदींचा दौरा महत्त्वाचा आहे.’’