नेवार्क : स्वयंघोषित गॉडमॅन आणि कोर्ट-घोषित फरारी नित्यानंदच्या ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ने ३० हून अधिक यूएस शहरांसह ‘सांस्कृतिक भागीदारी’ करार केला आहे. एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेसारख्या देशाला त्याने आपल्या बनावट फासात अडकवले आहे.
दरम्यान,अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील नेवार्क शहराने काल्पनिक देशासोबतचा ‘सिस्टर सिटी’ करार रद्द केल्याचे म्हटल्यानंतर काही दिवसांनी हा अहवाल आला आहे. नेवार्क आणि काल्पनिक ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ यांच्यातील ‘सिस्टर सिटी’ करार यावर्षी १२ जानेवारी रोजी झाला आणि नेवार्कमधील सिटी हॉलमध्ये एक समारंभ आयोजित केला गेला होता.
नित्यानंदने २०१९ मध्ये संयुक्त राज्य कैलासाची स्थापना केली होती. यांच्या वेबसाईटनुसार ३० हून अधिक अमेरिकी शहरांनी बनावट देश कैलासासोबत सांस्कृतिक करार केला होता. एका वेबसाईटनुसार या शहरांमध्ये रिचमंड, व्हर्जिनिया, ओहायो, डेटन आणि बुएना पार्कसोबत अनेक शहरांचा समावेश आहे.
नेवार्क शहराचे कम्युनिकेशन विभागाचे प्रेस सचिव सुसान गारोफालो यांनी एका मेलमध्ये सांगितले, जशी आम्हाला कैलासाच्या आजूबाजूची माहिती मिळाली. तशी नेवार्क शहराने कारवाई केली. ‘सिस्टर सिटी’ करार रद्द केला. नित्यानंद बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या अनेक गुन्ह्यांमध्ये भारताला हवा आहे. मात्र तो आरोप फेटाळत आहे.
स्वामी नित्यानंद याचे खरे नाव राजशेखरन असून त्याने योग, वेद, तंत्र, शैव याचा अभ्यास केला होता. नित्यानंद याने मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा केला होता. त्याने रामकृष्ण मठमधून आपले शिक्षण पूर्ण केले. याशिवाय २०१२ मध्ये नित्यानंदवर बलात्काराचाही आरोप करण्यात आला होता. त्यानंतर नित्यानंद भारतातून पळून गेला.